राष्ट्रवादीला कोरोनाचे गांभीर्य आहे की नाही ?, कल्याण-डोंबिवलीत कोरोना नियमांना फासला हरताळ

कल्याण : 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये परतलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा कोविड-19 चा नवा प्रकार आढळल्याचं त्याच्या प्रयोगशाळा अहवलातून सिद्ध झालं आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील हा तरुण रहिवासी असून त्याचं लसीकरण अद्याप झालेलं नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्याची लक्षणं सौम्य स्वरूपाची असून तो सध्या कल्याण डोंबिवली इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

या नव्या रुग्णामुळे राज्याची चिंता वाढली असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन केले केले. एकीकडे आरोग्यमंत्री नियम पाळण्याचे आवाहन करत असतना दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच कार्यकर्ते या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम करत आहेत.

आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसची कल्याण-डोंबिवली जिल्हा आढावा बैठक पार पडली. कल्याण येथील राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. या कार्यक्रमात कार्यकर्ते एकमेकांच्या शेजारी बसले होते. त्यांच्यात कोणतंही अंतर नव्हतं. त्यांच्या तोंडाला मास्कही नव्हतं. विशेष म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोरच कोरोना नियमांना केराची टोपली दाखवल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला काही गांभीर्य आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज कल्याणमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयास भेट दिली. या दरम्यान मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. रुपाली चाकणकर यांनी यावेळी महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र या कार्यक्रमा दरम्यान बहुतांश महिलांच्या तोंडावर मास्क नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

You May Also Like