गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात तुफान राडा; शेकडो प्रेक्षक स्टेजवर चढले, पुढे जे झाले…

बीड : लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या गौतमीवर आतापर्यंत अनेक स्थरातून टिका झाली आहे. अगदी मनसेही तिच्या डान्सला विरोध दर्शवला होता. अशातच आता बीडमध्ये गौतमीच्या डान्स कार्यक्रमात तुफान राडा झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

बीड शहराजवळील बीड-परळी राष्ट्रीय महामार्गलगत घोडका राजुरी शिवारात राष्ट्रवादीचे कार्यकर्ता तथा बारमालक रोहन गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन सचिन लांडे यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला हजारो तरुणांची उपस्थिती होती. दरम्यान कार्यक्रमाच्यावेळी तुफान राडा झाला.

गौतमीचा डान्स सुरू असताना, शेकडो लोक स्टेजवर चढल्याने एकचं गोंधळ उडाला. यावेळी स्टेजवर दगडफेक देखील झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. यात गौतमी पाटील सुखरूप आहेत. मात्र चालू कार्यक्रम बंद करण्याची नामुष्की आयोजकावर ओढवली. ऐन रस्त्यालगत कार्यक्रम असल्याने बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर तब्बल १ तास ट्रॅफिक जाम झाली होती. तसेच गौतमीला (Dance Video) पाहण्यासाठी काही हौशी तरुण झाडावर चढले होते. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.