‘बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यासाठी मी कायम कटिबद्ध’

कोल्हापूर : बहूजन समाजातील तरुणांना व्यवसासाठी पाठबळ देण्यासाठी इथून पुढे सारथी संस्था, राजे विक्रमसिंह घाटगे बँक आणि जिल्हा समन्वय केंद्र संयुक्तपणे काम करतील,सारथी युवकांना व्यवसायासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देईल तर राजे बँक आणि को-ऑपरेटिव्ह बँकांचे क्लस्टर त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देईल. कालच सारथी बरोबर झालेल्या बैठकीत सारथीने राजे बँकेबरोबर एकत्र येऊन काम करण्याला सकारात्मक साथ देण्यास तयार आहेत. अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, माझ्या पणजोबांच्या नावाने सुरू केलेली ‘सारथी संस्था’ आणि माझ्या वडिलांच्या नावाने सुरू असलेली ‘राजे विक्रमसिंह घाटगे बँक’ एकत्र येऊन शाहू महाराजांचा वारसा जपत बहुजन समाजाच्या विकासासाठी आणि तरुणांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी एकत्र येत आहेत. बहुजन समाजाचा एक घटक म्हणून माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

माझ्या प्रस्तावाचा विचार करून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सारथीचे मनापासून आभार.तरुणांना व्यवसायासाठी फक्त कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन चालणार नाही तर व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य ही मिळायला हवे. यासाठी सारथी आणि राजे बँकेने एकत्र येऊन कार्य करायला हवे. असा प्रस्ताव मी काही दिवसांपूर्वी सारथी समोर ठेवला होता.

सारथीकडून व्यावसायिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या काळात उर्जितावस्था प्राप्त झालेल्या आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेच्या माध्यमातून राजे बँक आणि को-ऑपरेटिव्ह क्लस्टर कर्ज उपलब्ध करून देतील.

बहुजन समाजातील तरुणांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी माझ्यादृष्टीने हे मोठे सकारात्मक पाऊल आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नांचा वारसा राजे विक्रमसिंह घाटगे यांनी जपला.

आता सारथी संस्था आणि राजे बँक एकत्र येऊन शाहू महाराजांचे बहुजन विकासाचे स्वप्न पूर्ण करत आहेत, ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. असे स्पष्ट करून याचा पथदर्शी प्रकल्प कोल्हापूरमध्ये राबवणार आहे व नंतर टप्प्याटप्प्याने हा राज्यभर राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

हे वाचलंत का ?