द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा मी भाग आहे याचा मला सार्थ अभिमान आहे – मृणाल कुलकर्णी 

मुंबई – काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या द काश्मीर फाईल्स या सिनेमाची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत. या चित्रपटाचे अनेकजण कौतुक करत आहेत तर काही ठिकाणी विरोध देखील होताना दिसत आहे तसेच काही मंडळी यावर टीका देखील करताना दिसत आहेत.

दरम्यान, या चित्रपटात भूमिका साकारलेल्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटाच्या बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या, भारतात काश्मिर प्रांतात १९९० मधे काश्मिरी पंडितांना एका रात्रीत अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडावं लागलं .. प्रचंड अत्याचार झाले.. हजारोंच्या संख्येत बलात्कार आणि हत्या झाल्या .. काश्मीरी पंडितांना आजपर्यंत आपल्या घरी परतता आलेलं नाही ! आपल्या देशात घडलेली इतकी मोठी आणि भयंकर घटना तुम्हाआम्हापर्यंत पोहोचलीच नाही ?!

त्यामागचं कारण आजच्या मीडिया मधल्या लोकांनी तरी समजाऊन सांगावं ..आपल्या मुलांपर्यंत आपला इतिहास आणि वर्तमानही योग्य रीतीने पोहोचवण्याची फार फार गरज आहे … जरूर पहा The Kashmir Files !! एक वास्तववादी चित्रपट !! मी या चित्रपटाचा भाग आहे याचा मला सार्थ अभिमान आहे ! असं त्यांनी म्हटले आहे.