उद्धव ठाकरेंचं  शरद पवारांवर एवढं प्रेम का हेच तर मला कळत नाही – कदम 

Mumbai – विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपबरोबर (BJP) सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले असून शिंदे गटाने आपला मोर्चा आता खासदारांकडे आणि जेष्ठ नेत्यांकडे वळवला आहे.

यातच आता शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam News) यांनी आज आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले,  उद्धव ठाकरेंचं  (uddhav thackeray) शरद पवारांवर एवढं प्रेम का हेच तर मला कळत नाही. कोडं उलगडत नाही. रात्री दोन दोन वाजता उठून बसतोय. झोप लागत नाही. जेवण जात नाही. तेच माझंही दुख आहे. आपला पक्ष फुटतोय. आपल्या पक्षात उभी फूट पडतेय. तरी उद्धव ठाकरे हे शरद पवारांना (sharad pawar) सोडत नाही. पक्ष संपला तरी चालेल. पण ते पवारांसोबत आहेत. हे का होतंय? नेमकं आजूबाजूला सांगणारे लोक कोण आहेत?, असा सवाल माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केला आहे.

रामदास कदम (ramdas kadam) यांनी पत्रकार परिषद घेऊन मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. त्याबाबतचे पुरावे मी उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. पण त्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे आज हे दिवस पाहायला मिळाल्याचा दावा कदम यांनी केला.