नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे, असे वाटत नाही; शरद पवारांनी काढला चिमटा

मुंबई  – देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. सद्या मिळून काम करणे हे जास्त महत्वाचे असून आम्ही एकत्र काम करू, चेहरा नंतर ठरवला जाईल अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

काल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली (Bihar Chief Minister Nitish Kumar and Deputy Chief Minister Tejashwi Yadav met Sharad Pawar at Silver Oak) . त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. संविधानाची ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यायला हवी असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.

जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली तशी आणखी लोकांना आली आहे. आम्ही वाट बघतोय अजून कधी आणि केव्हा येईल. सत्तेचा गैरवापर हा सातत्याने केला जातो आहे हे उत्तम उदाहरण असून आम्ही त्याविरोधात लढू असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला.

राज्यपालांची निवड किती चुकीची केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे आणि जाहीरपणाने त्यावर ते इथे असताना बोललो आहे. संविधानात राज्यपाल हे एक इन्स्टिटयुशन आहेत. त्याची अप्रतिष्ठा कशी केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले. सुदैवाने ते आज इथे नाहीत त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही असे स्पष्ट सांगतानाच राज्यपालांची निवड करताना जी काळजी घ्यावी लागते ती काळजी न घेता जाणीवपूर्वक तिथल्या स्थानिक अन्य राष्ट्रीय विचारांचे लोकप्रतिनिधींना किंवा संस्थेला त्रास कसा होईल ही भूमिका घेऊन या नियुक्त्या केल्यानंतर हे घडत आहे. त्याचेच उदाहरण आपण महाराष्ट्रात पाहिले असा थेट हल्लाबोलही शरद पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

कोर्टाच्या निकालानंतर भाजपविरोधात प्रचार करणे सोपे होणार आहे असे सांगतानाच ज्यांच्या नावाने निवडून येता त्या पक्षाचा आदेश महत्वाचा असतो. काही निर्णय अजून व्हायचे आहेत. त्यामुळे नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे, असे वाटत नाही असा उपरोधिक टोलाही शरद पवार यांनी लगावला. माझा महाराष्ट्र दौरा सुरुच राहणार असून आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र काम करू असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.