विधान परिषदेसंदर्भात मला कोणत्याही पक्षाकडून कसलीही ऑफर नाही – राजू शेट्टी 

सोलापूर – राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु असून यासोबतच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीची देखील चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेसंदर्भात (Legislative Council Election) मला कोणत्याही पक्षाकडून कसलीही ऑफर नाही आणि माझी तशी इच्छादेखील नाही. लोकांना वाटत असेल की मी आमदार व्हावे, तर जनतेनीच वर्गणी काढून मला निवडून द्यावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी  केले.

दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टियूटच्या साखर परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साखरेचा विषय आल्यावर मी उजव्या आणि डाव्या बाजूला पाहतो, त्या ठिकाणी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात बसलेले असतात, असे सांगितले होते. त्यावरून राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे.

तुम्ही मुख्यमंत्री होऊन अडीच वर्षे झाले आहेत. अजूनही तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेच बघत आहात. ते दोघेही साखर कारखानदार आहेत, त्यांना पाहिजे तसेच ते धोरण राबवणार. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले आहे, अजित पवार आणि थोरातांना नाही, याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी ठेवावी, असेही शेट्टी यांनी सांगितले.