मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही, राजीनामा देण्यासही मी तयार – श्रीकांत शिंदे

ठाणे – कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यावर आता खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ते म्हणाले, २०२४ साली नरेंद्र मोदी (Narendra Modi) साहेबांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे . त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. परंतु, काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना – भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे. मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना – भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू.

केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजिनामा देण्याची तयारी आहे. असं शिंदे यांनी म्हटले आहे.