चित्रपटात नथुरामची भूमिका केली, पण त्या विचारधारेचे मी कदापि समर्थन करणार नाही – कोल्हे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी ‘मैंने गांधी को क्यों मारा’ (Why I Killed Gandhi) या चित्रपटाच्या माध्यमातून नथूराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

दरम्यान, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. कॉंग्रेस नेत्यांनी तर या चित्रपट प्रदर्शनास विरोधही दर्शवला होता.यानंतर अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. परंतु, राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या विविध चर्चा काही थांबल्या नाहीत. राज्यातील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश केला.

दरम्यान, याबाबत माहिती देताना कोल्हे म्हणाले, महात्मा गांधींच्या हत्येचे मी व्यक्तिशः कधीही समर्थन केलेले नाही,करणारही नाही.त्यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली व आत्मक्लेश करीत नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली.

चित्रपटात नथुरामची भूमिका केली, पण त्या विचारधारेचे मी कदापि समर्थन करणार नाही. अशा क्षुल्लक गोष्टीने महात्मा गांधींचे विचार कधीही पुसले जाणार नाही. या निमित्ताने आजच्या तरुणाईमध्ये महात्मा गांधींबद्दल असलेली आस्था, निष्ठा बघून मला खूपच आनंद झाला. महात्मा गांधींच्या विचारांचे अमरत्वच यातून सिद्ध होते. सत्य, अहिंसा आणि क्षमाशीलतेचा त्यांनी जगाला दिलेला विचार संपूर्ण मानवजातीसाठी मोलाचा आहे. मीही त्या विचारांचा पाईक आहे अशी सारवासारव देखील त्यांनी केली.