संविधान बदलणाऱ्यांना बदलण्यासाठी मोदींसोबत मी उभा आहे – रामदास आठवले

सोमनाथ  – संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही. तरी काही लोक संविधान बदलले जाण्याची खोटी आवई उठवितात. संविधान बदलण्याची भाषा करण्यापेक्षा आपले मन बदला. संविधान बदलणाऱ्यांना  बदलविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मी मजबूत उभा आहे.मोदी यांनी संविधानासमोर माथा टेकवून शपथ घेतली आहे. मोदी हे संविधान पूजक आहेत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

एक मत एक व्यक्ती एक मूल्य ही समता देणारे; जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही मजबूत करणारे भारतीय संविधान प्रत्येक भारतीयाला न्याय देणारे आहे. त्यामुळे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारतीय संविधान ठरले असून भारतीय संविधानामुळे जगातील सर्वश्रेष्ठ  संसदीय लोकशाहीव्यवस्था भारतात असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.

गीर सोमनाथ येथील प्रभास पाटण गावातील  सभागृहात रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित सदभावना संमेलनात ना रामदास आठवले यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले.यावेळी रिपाइंचे गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोककुमार भट्टी,आयोजक गुजरात रिपाइंचे सरचिटणीस चंद्रसिंह महिडा,रिपाइं चे गुजरात निरीक्षक जतीन भुट्टा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्याचे दुःख कमी करणे हीच खरी सदभावना आहे . सदभावनेमुळेच शांतता प्रगती साधता येईल. एकमेकांच्या धर्माचा आदर राखून आपल्या धर्माचे पालन करत मानवते चा सदभावनेचा विचार वृद्धिंगत करावा. गावागावात होणारे कलह मिटविण्यासाठी गावातील लोकांनी सदभावना वाढविणे महत्वाचे आहे. एकमेकांवर अन्यायाची भूमिका हिंसेची भूमिका घेऊ नये. दलितांवर महिलांवर होणारे अत्याचार रोखवेत त्यासाठी सदभावना मनामनात वाढविली पाहिजे त्यासाठी असे सदभावना संमेलन आयोजित करणे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे आठवले म्हणाले.

गीर सोमनाथ येथे बौद्धकालीन प्राचीन लेणी सापडल्या असून त्या लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकार च्या पुरातत्त्व खात्याशी आपण बोलणार असून याभागात श्रीलंकेतून बोधिवृक्षाची फांदी आणून येथे बोधीवृक्षांचे वन उभारण्याची मागणी चांगली असल्याचे  रामदास आठवले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान बुद्धांना मानतात. गुजरात च्या मुख्यमंत्री निवासस्थानी भव्य बुद्ध मूर्ती आहे. असे  रामदास आठवले म्हणाले.