आयकर विभागाने फास आवळला, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या घरी धाड

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (rahul kanal) यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीस सुरू केली.

आज सकाळी आयकर विभागाने शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे.

यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की नाही याची माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्र किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागाने धाड मारल्याने एकच खळबळ उडाली आहे.