देशाचं संविधान वाचविण्यासाठी मला भाजपविरोधात लढायचं आहे – अंधारे

मुंबई – एकीकडे आमदार-खासदारांच्या बंडामुळे डॅमेज कंट्रोल भूमिकेत गेलेल्या शिवसेनेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. (Sushma andhare joins shivsena) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे सुषमा अंधारे या भीमा कोरेगाव प्रकरणातील तक्रारदारही आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अंधारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची मातोश्रीवर (Matoshree) भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर आज यावर शिक्कामोर्तब झालं.

उद्धव ठाकरेंनी देखील सुषमा अंधारे यांना शिवसेना प्रवेशाचं गिफ्ट दिलं. पक्षात प्रवेश केल्याबरोबर त्यांनी अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली. यावेळी आगामी काळात ग्रामीण भागांतून कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली पाहिजे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्याकडून व्यक्त केली.

दरम्यान, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण मी त्यापैकी नाहीये. ठाकरेंवर संकटाची वेळ आलेली असताना भावाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आज शिवसेनेत प्रवेश करतीये. मला पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नाहीये. फक्त देशाचं संविधान वाचविण्यासाठी मला भाजपविरोधात (BJP) लढायचं आहे, अशा भावना सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या.