निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाचं मला कोणतंही आश्चर्य वाटलं नाही – फडणवीस 

मुंबई- शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ (Bow & Arrow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.  गेल्या 20-25 वर्षांमध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह गोठवून नंतरच त्यावर अंतिम निर्णय दिल्याचा इतिहास आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं मला कोणतंही आश्चर्य वाटलं नाही, अशी पहिली प्रतिक्रिया फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे. कार्यपद्धतीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाचा (Election Commission  Of India) निर्णय असल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने नवीन नावं सांगितली आहेत, त्यामागे शरद पवार (Sharad Pawar) असल्याचं सांगितलं जातं. बोलणारे काहीही बोलत राहतील. गेल्या निवडणुकीच्या वेळी मोदींच्या नावावर निवडून आलेत. त्यांचे 18 खासदार आणि 56 आमदार हे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नावावर निवडून आले आहेत. मोदी यांचे नाणे खणखणीत आहे आणि ते कायम राहील, असं देखील ते म्हणाले.