मला कोल्हापूरातील रुग्णालयातच ठार मारण्याचा कट आखला होता : नितेश राणे

मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राणे यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) गंभीर आरोप केलाय. शरीरात चुकीचं औषध टाकून मला मारण्याचा कट होता. त्यांना सर्व विरोधकांनाही असंच संपवायचं आहे, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केलाय.

संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Attack Case) नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे, तसंच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे आपल्याला मारण्याचा सरकारचा डाव होता, असा आरोप  राणे यांनी केला आहे.

आमदार नितेश राणे सभागृहात बोलताना म्हणाले की, मी कोल्हापुरातील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी एन्जिओ टेस्ट करण्याची गरज असल्याचं सांगितलं. पण एका कर्मचाऱ्याने मला सांगितलं की साहेब, हे सीटी एन्जिओ करु नका. त्या निमित्ताने इंक शरीरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला मारुण टाकण्याचा प्लॅन आहे. या कर्मचाऱ्याने मला आधीच सांगितल्याने मी जिवंत राहिलो.