‘जोपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होत नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही’

वाराणसी – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. नेत्यांसोबत कार्यकर्ते देखील चांगलाच जोर लावताना दिसत असून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या पक्षासाठी काम करताना दिसून येत आहेत.

वाराणसीनचे गुलाब सोनकरही कॉंग्रेसच्या याच कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. ७० पेक्षा जास्त वय असलेले गुलाब सोनकर इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेस पक्षासोबत जोडले गेलेले आहेत. अनेक सरकारे आली आणि गेली, अनेक पक्ष बनले आणि संपले, पण गुलाब सोनकर यांनी काँग्रेसचा झेंडा सोडलेला नाही. त्यामुळेच आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या वाराणसीमध्ये काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी गुलाब सोनकर फिरताना दिसत आहेत. ते अनवाणीच पक्षाच्या प्रचारासाठी जात आहेत. गुलाब यांनी प्रदेशात काँग्रेसचे सरकार येईपर्यंत तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात काँग्रेस गेल्या ३२ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. १९८९ मध्ये सत्तेतून बाहेर पडल्यानंतर पक्षाकडे कोणतीही व्होट बँक नाही. त्यामुळे यंदा जर सरकार आले नाही तर सोनकर यांना अजून किती वर्षे विना चप्पल रहावे लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसला किमान पाच पटीने मताधिक्य वाढवावे लागेल. २०१७च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाशी युती करूनही काँग्रेसला केवळ सहा टक्के मते मिळाली होती. अशा परिस्थितीत प्रियांकाला मतांची टक्केवारी सहा टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढवावी लागेल. राज्यातील संघटनेची स्थिती लक्षात घेता महिला केंद्रित अभियान असूनही ध्येय सोपे नाही.