जर 15 आमदार बाद झाले तर नक्कीच अजित पवार भाजपबरोबर जातील – तृप्ती देसाई

पुणे : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar)  नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपसोबत जाणार असल्याची चर्चाही आहे.मात्र आता या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Social activist Anjali Damania) यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट करून खळबळ उडवून दिली आहे.

अजित पवार यांच्यासंदर्भात अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू…..आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावर आता भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांचीही प्रतिक्रिया आली आहे. आझाद मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या, जर 15 आमदार बाद झाले तर नक्कीच अजित पवार भाजपबरोबर जातीलच कारण या आधी सुद्धा ते उघड उघड भाजपबरोबर गेले होते आणि शपथविधीही उरकला होता.

बहुतेक अजित पवार सुद्धा सुप्रिया सुळे यांना कंटाळले आहेत.कारण अजित पवारांनी कितीही चांगले काम केले, तरी पवारांचा वारसा सुप्रिया सुळे यांनाच मिळेल आणि चुकून राष्ट्रवादीची सत्ता जरी आली तरी मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार नाही, याची त्यांना खात्री आहे. पण सध्या अजित दादा असे पाऊल उचलतील का नाही याबाबत थोडी शंकाच आहे कारण त्यांचा कंट्रोल पवार साहेबांकडे आहे. अजित पवार भाजप बरोबर जरी गेले तरी त्यांचे काम सगळ्यांना नक्कीच आवडेल. खरोखरच असे झाले तर मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जोडी खूप चांगली काम करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.