सबका साथ, सबका विश्वास’ असेल तर भाजपाची मदरशांवर वक्रदृष्टी का? – सचिन सावंत

मुंबई – देशात धार्मिक उन्माद वाढवण्याचे भाजपाचे पद्धतशीपणे प्रयत्न सुरु असून मदरशांचा मुद्दाही त्यातील एक भाग आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंता विश्वशर्मा यांनी मदरसे अस्तित्वातच नसावेत असे म्हटले आहे. नव्याने धर्मांतर केलेले अधिक कट्टर असतात अशी म्हण आहेच. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मदरशांना सरकारी अनुदान देण्यावर बंदी घातली आहे. हा सर्व प्रकार भाजपचा ढोंगीपणा उघड करणारा आहे. भाजपाला देशाचे संविधान मान्य नाहीच पण सावरकरांचा राष्ट्रवाद ही यांना मान्य नाही. भाजपाने आपल्या पक्षाच्या घटनेतून “धर्मनिरपेक्षता” हा शब्द काढून त्याऐवजी “जातीयवाद” जोडावा, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी लगावला आहे.

याप्रश्नी बोलताना सावंत पुढे म्हणाले की, मुस्लिम तरुणांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर असल्याच्या व्हिजनबद्दल पंतप्रधान मोदी बोलले होते. मोदी जी बोलतात तोच “सबका साथ सबका विश्वास” हा आहे का?

सावरकरांचा राष्ट्रवाद आमच्या दृष्टीने कितीही तर्कदुष्ट असला तरी १९३९ च्या हिंदू महासभेच्या कलकत्ता अधिवेशनात अल्पसंख्यांकांना त्यांच्या राष्ट्रवादात स्वतः च्या भाषेत सांस्कृतिक अथवा धार्मिक शिक्षण देण्यासाठी वेगळ्या शाळा असण्याची मुभा असेल असे सावरकर म्हणाले होते. त्याचबरोबर सरकारी अनुदान या संस्थांना मिळेल. आणि जर कोणी अल्पसंख्यांकांच्या उचित अधिकारांवर अतिक्रमण केले तर त्यांना न्याय मिळेल असा निर्वाळा दिला होता. आज भाजपाला संविधान मान्य नाही पण सावरकरांचा राष्ट्रवाद ही मान्य नाही हे स्पष्ट आहे असे सावंत म्हणाले.

20 ऑगस्ट 2001 रोजी मुरली मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले होते की वाजपेयी मदरशांच्या कामात हस्तक्षेप करू इच्छित नाहीत. 2002 मध्ये वाजपेयी सरकारने 1000 मदरशांना अनुदान दिले. भाजपा वाजपेयींना विसरली असेल तर ठीक आहे पण 2012 मध्ये गुजरातच्या भाजपा जाहीरनाम्यात तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री मोदींनी तर 2014 च्या लोकसभा जाहीरनाम्यात भाजपने मदरशांचे आधुनिकीकरण करण्याचे आश्वासनही दिले होते. ११ जून २०१९ रोजी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मदरशांच्या आधुनिकरणासाठी पावलं उचलून तेथील शिक्षकांना अन्य संस्थांकडून हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व संगणक विषयाचे प्रशिक्षण देऊन मदरशांतील विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा लाभ मिळेल याकरता योजना जाहीर केली होती. हे सर्व तोंडदेखले होते हे स्पष्ट आहे असे सावंत म्हणाले.

भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये गोळवलकर असतात आणि भाजपाची भुमिका दांभिकपणाची व दुटप्पी असते यात कोणतीही शंका नाही. हेमंता विश्वशर्मा व योगी आदित्यनाथ यांची मदरशासंदर्भातील भूमिका पाहता मोदींचा ‘सबका का साथ, सबका विश्वास,’ हा सुद्धा एक चुनावी जुमलाच आहे असे म्हणाले लागेल, असे सावंत म्हणाले.