मुंबई : शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणे वागत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित पवारांनी सांगितले. पीक विमा हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, तो मिळाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, जसे जसे पंचनामे येतील तशी लगेच मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत. सहा जिल्ह्यांची माहिती आल्यानंतर दोन जिल्ह्यांसाठी इतर जिल्ह्यांना मदत देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे सर्व विभागांना शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारचे निर्देश असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पुरविण्याची खबरदारी महाविकास आघाडीचे सरकार घेत असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मदत वाटपाचा आढावा घेतला जाणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
हे ही पहा:
https://www.youtube.com/watch?v=b7O0djiTTzI