‘केवळ काही दिवस तुरुंगात काढले तर हा कांगावा? भीमा कोरेगाव केसमध्ये ४ वर्षे जेलमध्ये आहेत त्यांनी काय म्हणावे?’

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य (Rana couple against Shiv Sena) असा वाद पाहायला मिळत आहे. मातोश्री समोर हनुमान चालीसा पठन (Hanuman Chalisa reading) करण्याचा आग्रह धरणाऱ्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर आता काल न्यायालयाने दोघानाही जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, राजद्रोहाच्या (Treason) आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवत राज्य सरकारला फटकारलं आहे.

राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही. राणा दांपत्याला जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. न्यायाधीश राहुल रोकडे (Judge Rahul Rokade) यांनी राणांना दिलेल्या जामीनाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली होती. त्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या नोटीसनंतर राणा घराबाहेर पडले नाहीत. राणा दाम्पत्याना अटक होण्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर आयपीसी कलम 124 A अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे.असं मत मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केलंय.

या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ठाकरे सरकारला आता बहुधा न्यायालयाच्या थपडा खाण्यासाठी नवा गाल शोधावा लागेल. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर लावलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं आहे असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. सुडाने पेटलेले महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्र्यांमुळे कोर्टाकडून किती वेळा बेइज्जत होणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून भाजपकडून महाविकास आघाडीला लक्ष्य केले जात असताना दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, राणा दाम्पत्यावर देशद्रोहाच्या गुन्ह्यासंदर्भात न्यायालयाच्या मतानंतर भाजपा नेत्यांना हर्षवायू होऊन मविआ राजवट जुलमी आहे असा साक्षात्कार झाला आहे. त्यांना आठवण करून देतो की मोदी सरकारनुसार २०१४ ते १९ पर्यंत मोदी राजवटीत ३२६ देशद्रोहाचे खटले दाखल झाले‌‌ त्यानंतरचे आकडेही दिले नाहीत.

नरेंद्र मोदी यांच्याविरोधात व आदित्यनाथ यांच्याविरोधात बोलले या आरोपातून प्रत्येकी १४९ व १४४ जणांवर देशद्रोहाचे खटले दाखल करण्यात आले आहेत. केरळाचा पत्रकार सिद्दीक कप्पन यावर हाथरस बलात्कार व मृत्यूवर बातमी करण्यासाठी गेला तर त्यावर युएपीए लावला गेला. दीड वर्ष तुरुंगात आहे. स्टॅन स्वामींना स्ट्रॉ व सीपर देण्यालाही मोदी सरकारने विरोध केला. गेल्या आठ वर्षांपासून जी अजब दहशत भाजपाच्या मोदी सरकारने देशात रोवली आहे त्या भाजपाला मविआ जुलमी वाटावा? केवळ काही दिवस तुरुंगात काढले तर हा कांगावा? भीमा कोरेगाव केसमध्ये ४ वर्षे जेलमध्ये आहेत त्यांनी काय म्हणावे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.