Eknath Shinde | मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक डाव खेळले. माझ्या कुटुंबावर चालून आले. परंतु तरीही मी सगळे सहन करून हिमतीने उभा राहिलोय. पण आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहिन, असा इशारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महायुतीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू झाली. महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि आमच्या महायुतीच्या सरकारची दोन वर्षे यांची तुलना करता लोकांना समजेल. राज्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच पातळी सोडून टीका केली जाते. एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतो. घरात बसून फेसबुकवरून सरकार चालवणाऱ्यांचं ते काम नाही. आम्ही फिल्डवर उतरतो आणि काम करतो. त्यामुळे लोकांची पसंती आम्हालाच आहे. येत्या काळात राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे, असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप