आंदोलक तरुणांनो … केसेस तुमच्या नावावर असतील तर कुठेही नोकऱ्या मिळणार नाहीत – पाटील 

मुंबई –  केंद्र सरकारने आणलेल्या सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेबाबत देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये अग्निपथ योजनेबाबत निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणी निदर्शनाच्या नावाखाली जाळपोळ, तोडफोड केली जात आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, असे आंदोलक तरुण करत आहेत.

आंदोलकांवर प्रशासनाकडून कारवाईही केली जात आहे. आतापर्यंत, यूपीच्या 4 जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी 6 एफआयआर नोंदवले आहेत, तर 260 लोकांना अटक केली आहे. वाराणसीमध्ये सर्वाधिक ३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. त्याचवेळी, बलियामध्ये सर्वाधिक अटक करण्यात आली असून, आतापर्यंत येथे 109 जणांना अटक करण्यात आली आहे.

या सैन्यभरती योजनेवर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले,  केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ (Agnipath Scheme) या सैन्य भरती योजनेविरुद्ध देशभरात आंदोलनं सुरु आहेत.मात्र आंदोलन करणारा तरुण हा सामान्य आहे. त्यांना विरोधकांकडून भडकवलं जात आहे. तरुणांनी थेट आंदोलनं करून अनेक केसेस अंगावर घेताना हे लक्षात घ्यावं की अशा केसेस तुमच्या नावावर असतील तर कुठेही नोकऱ्या (jobs) मिळणार नाही. ही धमकी नाही तर वस्तुस्थिती आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

योजनेच्या अनुशंगाने काही सूचना आणि त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील. मात्र काहीही मागण्या न करता थेट आंदोलन करणं, रेल्वे जाळणं चुकीचं असल्याचं मत चंद्रकांत पाटील यांनी नोंदवलं. अग्नीपथ योजना काय आहे, हे तरुणांनी आधी समजून घ्यावं. ती मान्य नसेल तर शांततामय मार्गाने चर्चा केली पाहिजे. आंदोलनाच्या मार्गाने तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेत आहात. तुमच्यावर केसेस दाखल होतील. कुठलीही नोकरी मिळणार नाही. मी भीती दाखवत नाही. मीही चळवळीत काम केलेलं आहे.असं पाटील म्हणाले.