‘अजितदादांच्या नेतृत्वात अधिवेशन नागपुरला झाल्यास विदर्भातील महत्वाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील’

मुंबई – राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे.विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.अधिवेशन कालावधीत लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार असून आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी देखील अनिवार्य करण्यात आली आहे.

पुढच्या कामकाजासंदर्भात 24 डिसेंबरला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विधीमंडळ कामकाज मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली.

यानंतर राजकीय तापायला सुरवात झाली आहे. अधिवेशनाला सामोरं जाण्याची सरकारची मानसिकताच नाही,अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अधिवेशन नागपुरात व्हावं अशी इच्छा बोलून दाखवली आहे. ‘ हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावं अशी सर्वांचीच इच्छा आहे, मात्र मुख्यमंत्र्याच्या प्रकृतीचा विषय असल्याने उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात अधिवेशन नागपुरला झाल्यास विदर्भातील महत्वाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील.’ असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.