‘विरोधकांचा आवाज अशापध्दतीने दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर ही अतिशय लाजिरवाणी बाब…’

ठाणे  – चुकीच्या पद्धतीने लोकप्रतिनिधीला अडकवण्याचा प्रयत्न करु नका. चुकला असेल तर जरुर कारवाई करा पण चुकलेलं नसताना मुद्दामहून गोवण्याचा प्रयत्न करणार असाल… नाउमेद करण्याचा प्रयत्न करणार असाल… जनमानसातून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणार असाल तर हे लोकशाहीला अतिशय घातक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज संध्याकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाणे येथे त्यांची भेट घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी सरकारच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

७२ तासात राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्र्यावर दोन – दोन गुन्हे दाखल होतात आणि या असल्या कारस्थानामुळे अतिशय नाराज होऊन जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देत असल्याचे ट्वीट केले असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली काय नसली काय… नेहमी सर्वधर्मसमभाव व शाहू – फुले – आंबेडकराचे विचार सातत्याने पुढे नेणारा सहकारी या नात्याने महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. असे असताना ज्या कारणाने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या क्लीपमध्ये कुठेही असा विनयभंग झाल्याचा दिसत नाही असेही अजित पवार म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री गाडीत बसले आहेत त्याच्या काही अंतरावर ही घटना घडली आहे. त्या गर्दीतून पुढे जाण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत हे दिसत आहे. त्यात कुठे आलाय विनयभंग असा संतप्त सवाल करतानाच आज सरकार बदललं आहे म्हणून काही विरोधकांचा आवाज अशापध्दतीने दाबण्याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

महाराष्ट्रात अशा घटना मागे कधी घडलेल्या नाहीत. सरकार येत असतं… जात असतं… कायम तिथे कोण बसायला आलेलं नाही. सत्तेत प्रमुख व्यक्ती बसते त्यांच्या पाठीशी १४५ आमदारांचा पाठिंबा असतो तोपर्यंतच बसू शकते हे अनेक वेळा सिद्ध झाले हे पाहिले आहे. असं असताना मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं की माझ्या समोरच हा प्रकार घडला तसा विनयभंग झाला नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांच्या हातात आहे असा अधिकारी तिथे दिसत आहे हेही आवर्जून अजित पवार यांनी नमूद केले.

या पध्दतीने राजकारण होणार असेल तर लोकशाही, संविधान, कायदा, नियम, घटना या सगळ्यांना तिलांजली देण्याचं काम चाललं आहे असा संतापही अजित पवार यांनी व्यक्त केला.माझ्या पक्षाच्या सदस्यावर अन्याय होत असेल तर त्यामागे काय वस्तुस्थिती आहे हे समजून घेण्यासाठी ठाण्यात आलो आहे. आव्हाड यांच्यासोबत चर्चा झाली. अगोदरचा गुन्हा देखील बघा… मारहाण झालेली व्यक्ती जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे वाचलो सांगत आहे. तरीदेखील जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बारा सहकार-यांवर गुन्हा दाखल करुन गुंतवण्याचा प्रयत्न होता. मात्र जसा – जसा वेळ जाईल तसा – तसा यामागचा सूत्रधार कोण आहे हे समोर येईल. कुणी त्या भगिनीला विनयभंगाचा गुन्हा दाखल करा सांगायला भाग पाडले आहे यामागे एक षडयंत्र आहे. असे स्पष्ट मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.

अशाप्रकारची षडयंत्रे रचून आपल्या शाहू – फुले- आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्याप्रकारचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातले पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेतली पाहिजे असा सल्लाही अजित पवार यांनी दिला. विनयभंगाचा कायदा होत असताना त्यावेळचे गृहमंत्री, समिती यामध्ये बरीच चर्चा झाली होती. कायदे कुणावर अन्याय होऊ नये म्हणून करत असतो परंतु कायद्याचा आधार घेऊन निष्पाप व्यक्तीवर अन्याय होत असेल तर हे घटनेला अनुसरून नाही असेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

पोलीस दबावाखाली वागत आहेत. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम केले आहे. १९९९ ते २०१४ लागोपाठ आम्ही पंधरा वर्षे सरकारमध्ये होतो. भुजबळ, आर. आर. पाटील आणि जयंत पाटील या तिघांकडे गृहमंत्री पद होते. साडेसतरा वर्षे गृहखाते राष्ट्रवादीकडे होते मात्र या खात्याचा गैरवापर होता कामा नये याची खबरदारी घेण्यात आली होती. त्यावेळी आदरयुक्त दरारा होता. अशाप्रकारचा अन्याय कुणावर होत नव्हता ही वस्तुस्थिती होती. जर यदाकदाचित कुणी प्रयत्न केला तर ज्याची चूक असेल त्याला तिथल्या तिथे खडसावले जात होते याची आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.

विनयभंगाचा प्रकार कुठेही दिसत नसताना ते कलम घालून गुन्हा दाखल केला जातो आणि लोकप्रतिनिधीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. आमदार म्हणून निवडून येतो. पाच लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो. जातपात मानत नाही हीच महाराष्ट्राची शिकवण आणि परंपरा आहे मात्र याच परंपरेला आज तिलांजली देण्याचे काम होते आहे हे अतिशय घातक आहे असेही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन नवीन कुठलेतरी विषय निर्माण करायचे आणि त्यातून वातावरण डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करायचा हे चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही सर्वजण जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. पाच लाख लोकांनी पाच वर्षासाठी आपल्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ न देता एकत्र, एकजुटीने सामोरे जाऊन दोन हात करण्याचे काम करु. शेवटी लोकशाही, संविधान टिकले पाहिजे त्यातून कुठे आपल्या महिलेवर अत्याचार होता कामा नये याची जाणीव आम्हाला सर्वांना आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागले पाहिजे आणि पोलिसांनी कुणाच्या दबावाला न घाबरता काही अधिकारी दबाव आहे सांगतात अरे बाबा… आधी कायदा, नियम काय सांगतो ते बघा ना.. दबावाला घाबरायचं काय कारण आहे. ही पध्दत नाही असे खडेबोलही अजित पवार यांनी सुनावले.

जितेंद्र आव्हाड यांनी दिलेला राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली आहे. आम्ही आक्रमकपणे जिथे – जिथे अन्याय होत असेल तिथे वाचा फोडण्याचे काम करू. अधिवेशन काळातही वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून वाचा फोडण्याचे काम करु आणि जनतेला वस्तुस्थिती लक्षात आणून देऊन काय प्रकार सुरु आहेत हे दाखवण्याचे काम करु त्यात तसूभरही कमी पडणार नाही अशी खात्रीही अजित पवार यांनी दिली.