कोरोनाची संख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल – अजित पवार

मुंबई – कोरोनाच्या केसेस (Corona cases) सध्या वाढायला लागल्या आहेत. रुग्ण वाढणे हे काळजीचं कारण आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क (Mask) वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

आज जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या तिन्ही लाटेत राज्यातील जनतेने कोरोनाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे सध्या वाढत असलेल्या संख्येवर राज्यसरकार व सर्व यंत्रणा लक्ष ठेवून आहोत असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान,  मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्र सरकारकडे येणारी जीएसटीची रक्कम ही २९ हजार ६४७ कोटी रुपये होती. केंद्रसरकारने दोन दिवसांपुर्वी संपुर्ण देशातील २१ वेगवेगळ्या राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपये दिले. त्यापैकी १४ हजार १४५ कोटी एवढी रक्कम राज्यसरकारला मिळाली. अद्याप आपल्याकडे येणारी रक्कम १५ हजार ५०२ कोटी रुपये आहे. २०१९-२० पासून ज्यावेळी जीएसटी कायदा अस्तित्वात आला. राज्यसरकारांनी ठराव करुन त्याला मान्यता दिली. २०१९-२० सालामधील महाराष्ट्राच्या वाट्याचे १ हजार २९ कोटी, २०२०-२१ मधील ६ हजार ४७० कोटी बाकी आहेत. २०२१-२२ मधील ८ हजार ३ कोटी रुपये बाकी आहेत. ही रक्कम देखील लवकर मिळावी, यासाठी राज्यसरकारकडून प्रयत्न केले जातील. याचा फायदा अर्थसंकल्पातील उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी आणि विविध विकासकामांसाठी होईल असे सांगतानाच पेट्रोल-डिझेल आणि गॅसवरील कर (Taxes on petrol-diesel and gas) कमी करुन राज्यसरकारने साडे तीन हजार कोटी महसूल सोडून दिला आहे. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने होत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे अजित पवार म्हणाले.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना अजित पवार यांनी पत्रकारांनी राज्याचे जीएसटीचे किती पैसे बाकी आहेत, हे विचारल्यानंतर ते सांगणे रडगाणे असते का? वस्तूस्थिती लक्षात आणून देणे चूक आहे का? असा थेट सवाल उपस्थित केला.