Vijay Wadettiwar | राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यातच आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा, असे आव्हान काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिले.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीचे पितळ उघडे पडेल, या भीतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलू दिले जात नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा हा थयथयाट सुरू आहे. महायुतीत २०० च्यावर आमदार आहेत. तरी आरक्षणाचा प्रश्न महायुती सरकार सोडवत नाही. उलट सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडले जात आहे. विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केली.
मराठा आणि ओबीसी समाजात महायुतीने तेढ निर्माण केले आहे. आरक्षणाचा प्रश्न या सरकारला सोडवायचा नाही. हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने सभागृहात भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित आहे. त्यामुळे जनतेला आरक्षणाबाबतची माहिती मिळू शकते. परंतु सरकारला जनतेला अंधारात ठेवायचे आहे. म्हणून आरक्षण प्रश्नावर सरकार सभागृहात बोलत नाही. खरे तर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळे महायुतीने सत्तेतून बाहेर पडावे, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :