संप चालू ठेवला तर सरकारला खाजगीकरण करण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळू शकतो – चौधरी

पुणे – कामावर हजर होण्यास नकार देणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा राज्याचे वाहतूक मंत्री अनिल परब यांनी राज्य परिवहन मंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांना काल दिला. सर्व संप करणाऱ्यांनी आजच कामावर हजर व्हावं,असं आवाहन परब यांनी केलं असून कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन रद्द केलं जाईल,असंही आश्वासन त्यांनी दिलं आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतर आणि भाजपनं संपाला असलेला पाठींबा तात्पुरता काढून घेतला असतानाही संपकरी कर्मचारी विलीनीकरणाच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून या परिस्थितीवर भाष्य केले आहे. ते म्हणतात,कोणत्याही आंदोलनात व्यावहारिकतेचा भाग म्हणून परतीचे दोर कायम ठेवायचे असतात. अन्यथा कडेलोट होऊ शकतो. विलीनीकरण कोणत्याही स्थितीत शक्य नाही. मोठी पगारवाढ मिळालेली आहेच. जनतेची सहानुभूती अजून गमावली तर आंदोलनाला कोणतंही पाठबळ राहणार नाही.

संप चालू ठेवला तर सरकारला खाजगीकरण करण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळू शकतो. सरकारातील बहुतेकांना खाजगीकरणात रस आहे हे कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावं. एसटी कर्मचारी यावर विचार करतील अशी आशा आहे असं चौधरी यांनी म्हटले आहे.