गुणपत्रिका छापण्यासाठी विद्यापीठाकडे पैसे नसतील तर युवासेना भीक मांगो आंदोलन करून विद्यापीठाला पैसे देणार

पुणे  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर केला. त्याच्या अडीच महिन्यांनंतरही हजारो विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेली नाही. पुणे विद्यापीठाकडे स्टेशनरी उपलब्ध नसल्याने गुणपत्रिकांची छपाईच होऊ शकली नसल्याची बाब पुढे आली आहे.छपाईसाठी कागदसह अन्य स्टेशनरी उपलब्ध नसल्याचे सर्व विद्यार्थ्यांची गुणपत्रिका छापणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडीच महिन्यांनंतरही गुणपत्रिका प्राप्त होत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

विद्यार्थी हितासाठी लागणाऱ्या साधनसामुग्री वर लक्ष न देतां ठेकेदारांच्या आर्थिक फायद्यासाठी चालू असलेले आर्थिक उद्योग विद्यापीठ प्रशासनासला जागेवर थांबवता आले नाही तर विद्यापीठ विद्यार्थ्यांचे न राहता ठेकेदारांना पैसे कमवून देणारा कारखाना होईल. त्यामुळे विद्यापीठाला जमत नसेल तर युवासेना स्वतः भीक मांगो आंदोलन करून विद्यापीठाला गुणपत्रिकांसाठी पैसे देईल असा इशारा युवासेना सहसचिव कल्पेश यादव यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी आज कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युवासेना कक्ष अध्यक्ष कुणाल धनवडे, सचिव ज्ञानंद कोंढरे, सरचिटणीस परमेश्वर लाड,उपाध्यक्ष विशाल हुलावळे उपस्थित होते.

यादव म्हणाले, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सर्व पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिकासह सर्व प्रमाणपत्रे आऊटसोर्सिंग न करता स्वत:च छपाई करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोट्यवधी रुपयाची बचत होत असून, सर्व डाटाही विद्यापीठकडे उपलब्ध होत आहे. या सर्व प्रमाणपत्राच्या छपाई करण्यासाठी लागणारी स्टेशनरी निविदा काढून खरेदी केली जाते. विद्यापीठाला जवळपास सुमारे दहा लाख गुणपत्रिकांची छपाई करावी लागते. यंदा मात्र निविदा काढून कागद खरेदी करण्याच्या प्रक्रियेस देखील विलंब झाला आहे.विद्यापीठ आवारात सुशोभीकरणासाठी अवाढव्य खर्च केला जात आहे. हा खर्च करण्यासाठी विद्यापीठाकडे जर पैसे असतील तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या कार्यात अडथळे का येतात ? विद्यापीठाकडून अन्य कामांसाठी तत्परता दाखविली जाते. मात्र, परीक्षा विभागाच्या कामासाठी इतकी दिरंगाई का ? असा सवाल देखील त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला विचारला आहे.

गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. युवासेना विद्यापीठास गुण पत्रिका छापण्यासाठी लागणारा खर्च भीक मांगो आंदोलन करून देणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने आमच्यावर ही भीक मागायची वेळ येऊ देऊ नये अशी विनंती आज कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. पुढील एका आठवड्यात जर गुण पत्रिकांची छपाई सुरू झाली नाही तर युवासेना आक्रमक पद्धतीने हे भीक मांगो आंदोलन करेल असा इशारा देखील यादव आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.