आपल्याला जगातली आर्थिक शक्ती व्हायचं असेल तर आपण…; नितीन गडकरींनी सांगितला एक्शन प्लान 

मुंबई – आपल्याला जगातली आर्थिक शक्ती व्हायचं असेल तर आपण तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहीजे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलं आहे. कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जगातलं सर्वाधिक कुशल अभियांत्रिकी मनुष्यबळ भारताकडे आहे, ही आपली ताकद असून तिचा तंत्रज्ञानासाठी वापर व्हायला हवा असं त्यांनी सूचवलं.  आधुनिकीकरण आणि पाश्चिमात्तीकरण या दोन भिन्न गोष्टी आहेत, आणि आपण पाश्चिमात्तीकरणाचे समर्थक नसलो तरी, वेळोवेळी जिथे गरज आहे तिथे आधुनिकीकरणाची कास मात्र धरली पाहीजे असं आवाहन त्यांनी केलं.

नवोन्मेष, उद्योजगता, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन कौशल्य आणि यशस्वी कार्यपद्धती म्हणजे ज्ञान आहे. या ज्ञानाचं संपत्तीत रुपांतर करणं हेच भविष्य आहे असं गडकरी यांनी सांगितलं. विश्वासार्हता आणि गुडवील हे एकविसाव्या शतकातलं मोठं भांडवल आहे, हे भांडवल संस्कारातून मिळतं असं ते म्हणाले. या मूल्यांना व्यायसायिक दृष्टीकोन आणि कौशल्याची जोड मिळाली तरच यश मिळतं असं ते म्हणाले.

येत्या काळात समाजाला खरोखर  सुखी, समृद्ध, संपन्न करायचं असेल तर समाजाल जल, वायू आणि ध्वनी प्रदुषणापासून मुक्ती द्यावी लागेल. आपल्या मंत्रालयाच्या विविध कामांतून आपण हाच प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगीतलं. मुंबई, ठाणे, कल्याण इथल्या सगळ्या बस इलेक्ट्रीक झाल्या तर सर्व नागरीक ३०टक्के कमी खर्चात वातानुकुलीत बसमधून प्रवास करू शकतील.  हे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे असं त्यांनी सांगितलं. पण याबाबतचे निर्णय वेगात आणि वेळेत व्हायला हवेत. वेळ हे आजचं मोठं भांडवल आहे असं ते म्हणाले.

आपण आपल्या जीवनात सातत्यानं लोकहित, दलित, शोषित, पिडीतांसाठी काम केलं पाहीजे, पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांनीही अंत्योदयाचा हाच विचार आपल्याला दिला आहे असं ते म्हणाले. सामाजिक दायित्व आणि त्याबद्दलची संवेदनशीलता कायम ठेवत, बँकेनं आजवरची यशस्वी वाटचाल केल्याबद्दल त्यांनी बँकेचं अभिनंदन आणि प्रशंसा केली.

जागतिक अर्थकारणाच्या युगात सहकारी बँकांची स्पर्धा आंतरराष्ट्रीय बँकांसोबत असणार आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रामाणिकपणा, सचोटी, सामाजिक बांधिलकी आणि व्यावसायिकता  जपून वाटचाल करत राहा असं आवाहन त्यांनी केलं. बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर, बँकेच्या संचालक मंडळातले सदस्य, कर्मचारी आणि भागधारक आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थीत होते.