महिला मुख्यमंत्री करायच्या असतील तर रश्मी ठाकरे सज्ज आहेत – सत्तार 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीतील नेते विविध दावे करत आहेत. यातच आता सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील लोकांसोबत चर्चा केली. सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचेदेखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं घातलं.

यानंतर आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलताना २५ वर्षानंतर सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री पदी नंबर लागावा प्रार्थना आहे, असे म्हटले. महिला मुख्यमंत्री करायच्या असतील तर रश्मी ठाकरे  सज्ज आहेत. त्यांना राजकारणाचा अभ्यास आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी महाराष्ट्राच्या तमाम मंदिरांमध्ये आधीच पूजा झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २५ वर्षे मुख्यमंत्री पदी राहतील. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री कोणत्या तारखेला होणार याबद्दल मी बोलणं योग्य होणार नाही. २५ वर्षानंतर त्यांचा नंबर लागावा हीच ईश्वरकडे आमची प्रार्थना आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले.

दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हेच पुढची 25 वर्ष मुख्यमंत्री असतील. सोनिया गांधी (Sonia Gandhi), शरद पवार (Sharad Pawar), सुप्रीया सुळे (Supriya Sule) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Thackeray) नेतृत्त्वावर खूश आहेत, असं  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील, असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. असं राऊत म्हणाले.