कोणतेही काम सचोटीने केलं तर प्रगती नक्कीच होते- छगन भुजबळ

नाशिक :- कुठलही काम सचोटीने केलं तर प्रगती नक्कीच होत असते. त्यामुळे बँकेच्या विकासासाठी सर्व संचालक मंडळाने आपले काम सचोटीने सुरू ठेवावे त्यातून बँक नक्कीच यशस्वी वाटचाल करेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नामको मल्टीस्टेट श्येड्युल बँक नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय कार्यालयाचा उदघाटन सोहळा व नामको मोबाईल बँकिंग अप चा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे,जयकुमारजी रावल व सारस्वत को ऑप बँक लि. मुंबई चे अध्यक्ष गौतम ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार माणिकराव कोकाटे,आमदार सीमा हिरे, देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड,उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे,नामको बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक, उपाध्यक्ष प्रकाश दायमा, संचालक माजी आमदार वसंत गीते,सोहनलाल भंडारी, शोभाताई छाजेड, रंजन ठाकरे, विजय साने, कंतीशेठ जैन, सुभाष नहार, नरेंद्र पवार, शिवदास डागा, अविनाश कोठी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, जयप्रकाश जातेगावकर, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक राहुल दिवे यांच्यासह बँकेचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नागरिकांना बँकेच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करणे शक्य होत असते. त्यामुळे याठिकाणी काम करत असताना पक्षविरहीत कामकाज होणे आवश्यक असते. त्यानुसार पक्षाची जोड बाजूला ठेऊन संचालक मंडळ काम करत आहे. ही अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. या बँकेच्या कामकाजाकडे बघून इतरांनी देखील कामकाज करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, चांगले काम करत असतांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे खचून न जाता चांगले काम करत रहा असे आवाहन केले.

यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, सहकार क्षेत्रात काम करत असतांना राजकारण विरहित काम करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नामको बँक काम करत आहे. नक्कीच गौरवाची बाब आहे. सहकार क्षेत्रात अनेक अडचणी आहे. त्या अडचणींवर मात करत सहकारात पुढे जायचे आहे. कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु देशातील नागरिकांनी यशस्वीपणे मात केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले की, संचालक मंडळ कसे आहे त्यावर बँकेची वाटचाल ठरत असते. संघाचे संचालक मंडळ ज्या माध्यमातून काम करतय त्या दृष्टीने बँकेचे वाटचाल नक्कीच गौरवशाली असणार आहे. बँकेने सभासदांचे हित जोपासण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. बँकेत मनुष्यबळ, ठेवी अधिक आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल माजी अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हेमंत धात्रक तर सूत्रसंचालन प्रकाश दायमा यांनी तर आभार विजय साने यांनी मानले.