‘पक्षाने तुम्हाला पद देऊन एक सन्मान दिला आहे तो सन्मान आपल्याला नको असेल तर दुसऱ्याला संधी द्या’

पुणे – पुणे जिल्ह्याकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांना सांगितल्या आहेत. इथली संघटना मजबूत आहे यात काहीच दुमत नाही. कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी पार पाडली आहे, लोकसभेला खासदार सुप्रियासुळे, खासदार अमोल कोल्हे यांना निवडून दिले आहात. मात्र दौंड, खडकवासला याठिकाणी आपला निसटता पराभव झाला. पुढच्या वेळी आपल्याला या जागा निवडून आणायच्या आहेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्हयातील मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. आज पुणे ग्रामीण मतदारसंघाचा आढावा घेतला. गाव पातळीवर नियमित बैठक घ्या, युवक अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्यात फिरतीवर रहावे, विविध कार्यक्रम घ्यावेत, निरीक्षण करावेत व पाठपुरावा करावा असेही मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले.

प्रदेश कार्यालयातून ज्या सुचना येतात अशा महत्त्वाच्या सुचना लक्षात घेऊन अंमलबजावणी करावी. पक्षाने तुम्हाला पद देऊन एक सन्मान दिला आहे तो सन्मान आपल्याला नको असेल तर दुसऱ्याला संधी द्या. पैसा येतो – जातो पैशांनी निवडणूक जिंकता येत नाही मात्र वेळ गेला की वेळ परत येत नाही हे लक्षात घ्या असेही जयंत पाटील म्हणाले. आम्ही बोलायचे आणि तुम्ही ऐकायचे यातून संवाद होत नाही. तुमच्या- आमच्यात संवाद व्हावा यासाठी ही परिवार संवाद यात्रा आहे. ज्या पक्षात संवाद नाही तिथे यश नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सध्या देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या स्थानी आहे. राज्यात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव काढले जाते. सभागृहातील उपस्थिती, मुद्देसुद मांडणी, यासाठी संसदेत आपल्या पक्षाचे नाव आहे. या सर्व गोष्टींच्या जोरावर एक चांगली संघटना उभी करू असे आश्वासन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी दिले.

संघटना सर्वप्रथम असते, पवारसाहेबांनी संघटनेला प्राधान्य दिले त्यामुळे आज आपला पक्ष विस्तारला आहे. विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून चांगले यश पक्षाला मिळाले. काही जागा थोड्याबहुत मतांनी पडल्या मात्र येणाऱ्या काळात आपल्याला याची कमी भरून काढायची आहे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे मनपा मधल्या काळात आपल्या हातात नव्हती. पुणे शहर विस्तार करत आहे. लोकसंख्या वाढत आहे. यासाठी बुथ कमिट्या अतिशय महत्त्वाच्या आहे. आपण जिथे कमी पडलो तिथे बुथ संघटना असायला हवी होती. येत्या काळात तुम्ही हे काम पूर्ण कराल असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

तरुण तरुणी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय असे समाजातील प्रत्येक घटक हा राष्ट्रवादी पक्षासोबत जोडला जाईल अशी व्यवस्था निर्माण करा. सर्वधर्मसमभाव अशाप्रकारे आपण राजकारण करावे, धर्माधर्मात फुट पाडण्याचे काम होत असेल तर त्याला उत्तर द्यावे. कोणत्याही धर्माचा अवमान होईल असे काम करू नका असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. रिंगरोड असेल किंवा इतर कामे असेल त्यांची पूर्तता करून पुण्याचा विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही अजित पवार म्हणाले.

या संवाद यात्रेला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार दिलीप मोहिते, आमदार सुनिल शेळके, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कात्रज अध्यक्ष केशरताई पवार, सुरेश घुले, रमेश थोरात, विजय कोलते, शिल्पा भोसले, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुळे, युवती जिल्हाध्यक्षा पुजा बुट्टेपाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष सचिन गुप्ता आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.