हिम्मत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घ्या : नाना पटोले

मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करुन पुन्हा निवडणुका घ्या या भारतीय जनता पक्षाच्या आव्हानाला काँग्रेसनेही प्रतिआव्हान दिले आहे. भाजपामध्ये हिम्मत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे प्रति आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते सैरभैर झाले आहेत. दोन वर्ष वारंवार हे सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक प्रयत्न केले, राजभवनाच्या माध्यमातूनही प्रयत्न करुन काही उपयोग झाला नाही. सीबीआय, ईडी, आयकर, एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातूनही मविआ सरकारमधील मंत्री व नेत्यांवर खोट्या केसेसच्या टाकून कारवाई करण्यात आली, महाराष्ट्राला बदनाम केले परंतु सरकार पडत नाही उलट ते भक्कम झाले आहे हे पाहून भाजपा नेत्यांना नैराश्याने ग्रासले आहे. या नैराश्येतूनच महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्याची भाषा केली गेली आहे. पण भाजपात हिम्मत असेल तर केंद्र सरकार बरखास्त करुन बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, भाजपाचा पराभव नक्की होईल.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान करत आहे. भाजपा सत्तेत असताना एसटी विलिनीकरणाविरोधात भूमिका घेतली होती आणि आता तेच मागणी करत आहेत. केंद्रात सत्तेत असलेले भाजपाचे सरकार एलआयसी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, भेल, अशा सरकारी कंपन्या उद्योगपतींना विकत आहे आणि येथे मात्र एसटीचे विलिनीकरण करण्याची भूमिका घेत आहे, ही भाजपची भूमिका दुटप्पी आहे, असे पटोले म्हणाले.