‘मी मलीकांसारखी हर्बल तंबाखू खाऊन बोलत नाही’

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांची कथित ऑडिओ क्लीप आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामध्ये बोंडे यांनी केलेलं वक्तव्य खोटं असल्याचं नवाब मलिक म्हणाले.

अमरावती हिंसाराच्या घटनेवरुन अनिल बोंडे आणि नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. मलिक यांनी ट्विटरवर अमरावती हिंसाचार प्रकरणाशी संबंधित बोंडे यांचं कथित ऑडिओ क्लीप शेअर केली होती. त्यावर आता अनिल बोंडे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. आता अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही अनिल बोडेंनी निशाणा साधला आहे.

माझ्या कालच्या संभाषणावर पूर्णत: ठाम आहे. कारण मी जे काही बोलतो ते शुद्धीत बोलतो. मी कोणतंही हर्बल तंबाखू खात नाही. मी दारु पिऊन बोलत नाही. त्यामुळे नवाब मलिकांसारखं बेहोशीमध्ये वक्तव्य करण्याची माझी सवय नाही. मी जे बोललो त्यावर कायम आहे, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत.

भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये दंगली होत नाही. महाविकास आघाडीच्या किंवा तथाकथित सेक्यूर, डाव्या विचारांचं सरकार असलेल्या राज्यामध्ये दंगली होतात. कारण या दंगलीला संरक्षण आणि प्रोत्साहन देण्याचं काम हे सरकार करतं. त्यातले मंत्री करतात, असा आरोप यावेळी अनिल बोंडे यांनी केला आहे.