केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी पदावर राहता कामा नये, त्यांनी तात्काळ पदावरुन दूर व्हावं – शरद पवार

मुंबई : उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथील घटनेची माहिती बाहेर आली. सुदैवाने त्याचे व्हिडिओही समोर आले. शांतपणे चाललेल्या शेतकऱ्यांना काही लोक गाडीची धडक देतात, त्यातून हिंसा भडकून तीन-चार लोकांची दुर्दैवाने हत्या झाली. असा प्रकार दुर्दैवाने कधी घडला नव्हता. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजपला लगावला आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एनसीबी, ईडी, आयकर विभाग या यंत्रणांवर भाष्य केलेच शिवाय लखीमपूर हिंसाचारात युपी सरकारवर निशाणा साधला तर बंदमध्ये सहकार्य केलेल्या राज्यातील जनतेचे आभार मानले आणि पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली.

ही घटना घडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा चिरंजीव त्याठिकाणी उपस्थित होता. उत्तरप्रदेश सरकारने मात्र हा दावा फेटाळून लावला. सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीवर जरी आरोप असला तरी सत्ताधारी पक्षाने यात काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेणे, अपराध्यावर कारवाईची उपाययोजना न करणे ही जबाबदारी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही. तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी देखील पदावर राहता कामा नये, त्यांनी तात्काळ पदावरुन दूर व्हायला हवे अशी मागणीही शरद पवार यांनी केली.