पुण्यातील अनधिकृत बॅनर, अनाधिकृत बांधकामे तात्काळ हटवा – संभाजी ब्रिगेड

पुणे –  पुणे महानगरपालिकेला 100 वेळेस अनधिकृत बॅनर (होर्डिंग) चा शहरात व उपनगरात सुळसुळाट झालेला आहे. या विरोधात वांरवार तक्रार केली तरी बॅनर काढले जात नाहीत. छोट्या-मोठ्या चौका-चौकात सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पुण्याचं विद्रुपीकरण झालेला आहे हे तात्काळ थांबलं पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

पुण्यात बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना आपण तक्रार केली तर संबंधित अधिकाऱ्यांना पैसे कमावण्याचे नवीन साधन मिळतं. ज्यांच्याविरोधात तक्रार केली असेल त्यांच्याकडून सर्रास पैसे घेऊन प्रकरण मिटवले जाते. मात्र दिलेल्या तक्रारीचा निकाल लागत नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर, आतील रस्त्यांवर, उपनगरांमध्ये नगरसेवकांच्या दहशतीखाली व आशीर्वादाने सर्रास अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतले जातात, अनधिकृत फेरीवाल्यांनी रस्ते लहान करून टाकले आहेत… इ.या सगळ्यांना पाठीशी कोण घालत आहे…? हे शोधून काढलं पाहिजे.असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

पुणे मनपा कडे तक्रार करून सुद्धा जर त्यावर कायदेशीर कारवाई होणार नसेल तर जबाबदार अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे. बरेच कर्मचारी त्या त्या ठिकाणी दहा-वीस वर्षापासून नोकरी करत असल्यामुळे सर्वांचे सवते ‘सुभे’ झालेले आहेत. बरेच खालचे कर्मचारी हे नगरसेवकांचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. हेच लोक अनधिकृत बांधकामांना अनधिकृत होर्डिंग आणि बेकायदेशीर कामांना अभय देतात. या सर्वांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.असं त्यांनी सांगितले.

नगरसेवकांच्या घरातील आई-वडिलांची, काका-मामांची नाव उद्याने, दवाखाने, चौक, मनपा शाळा, सभागृह इ. यांना देण्याचा संबंध काय…? ज्यांचं शून्य काम असतं… अशा लोकांची नावं उद्यान, दवाखाने, मनपा शाळा व चौकांना दिली जातात हे थांबले पाहिजे. पैसा जनतेचा…! आम्ही टॅक्स भरतो आणि नगरसेवकांची आणि त्यांच्या कुटुंबाची नाव दिली जातात हे थांबलं पाहिजे. मा. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन सर्व उद्याने, शाळा, सभागृह, दवाखाने चौक व इतर ठिकाणची नगरसेवकांच्या नातेवाईकांची सर्व नावे तात्काळ रद्द करावीत… अन्यथा दहा दिवसात संभाजी ब्रिगेड पुणे महानगर पालिकेच्या समोर तीव्र आंदोलन करणार आहे.असा इशारा देखील शिंदे यांनी दिलाय.