स्वतंत्र भारताच्या नवनिर्मितीमध्ये कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महत्वपूर्ण योगदान – इंद्रेश कुमार

पुणे – संस्कार आणि संस्कृती मनुष्याला घडवत असते, ज्या शिक्षणात संस्कार, संस्कृती, सत्कर्म, समाधान, सामार्थ्य असते तेच शिक्षण दीर्घकालीन  राहते, तेच शिक्षण महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था स्वतंत्र भारताच्या नवनिर्मितीमध्ये  देत आहे. आणि  या संस्थेचे  महत्वपूर्ण योगदान आहे असे प्रतिपादन इंद्रेश कुमार यांनी बाया कर्वे पुरस्कार प्रदान समारंभात केले. तसेच कर्वे संस्थेने अशा प्रकारचे शिक्षण  जम्मू काश्मिर मध्ये सुरु  करावे असे ही ते  म्हणाले. महर्षी  कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने या वर्षीचा राष्ट्रीय स्तरावरील २६ वा बाया कर्वे पुरस्कार जम्मू येथील अदिती प्रतिष्ठानच्या किलांबी पंकजा वल्ली यांना इंद्रेश कुमार राष्ट्रीय कार्यकारिणी  सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप  रु.१,०१,०००/- व स्मृतीचिन्ह  असे आहे.

या पुरस्कार प्रदान समांरभाच्या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा  स्मिता घैसास, कार्याध्यक्ष रविंद्र देव, उपकार्याध्यक्ष विद्या कुलकर्णी , व्यवस्थापक मंडळाचे सभासद सीमा कांबळे,  निवड समितीचे सभासद संजय तांबट, विभावरी बिडवे  व संस्थेचे सचिव डॉ. पी. व्ही.एस. शास्त्री उपस्थित होते. संघाचे व देशभक्तीचे संस्कार झालेल्या पंकजादीदी यांनी  त्यांच्या प्रकट मुलाखतीमध्ये  २७ वर्षाच्या जम्मु-काश्मिरमध्ये  केलेल्या कामाबददल अनेक अनुभव कथन केले. जम्मू-काश्मीरमध्ये १९९० च्या दशकात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या. अशा अस्वस्थ व अशांत वातावरणात १९९६ मध्ये पंकजादीदी पहिल्यांदा जम्मूला आल्या आणि तेव्हापासून जम्मू-काश्मीर हेच त्यांचे घर झाले. दहशतवादी हल्ले, बाँबस्फोटांमधील जखमींवर जम्मूतील रुग्णालयांमध्ये उपचार होतात. पंकजादीदी या रुग्णांना भेटून त्यांची आत्मीयतेने विचारपूस करू लागल्या. तिथली दृश्ये अतिशय विदारक असत. अशाच सुरवातीच्या एका भेटीत एक लहान मुलगी पंकजादीदींना चिकटून बसली. तिचे आईवडील दोघेही गंभीर जखमी होते व ही लहानगी घाबरलेली होती. तेव्हापासूनच दहशतवादी कारवायांमध्ये जखमी होणाऱ्या, अनाथ होणाऱ्या मुलामुलींना सुरक्षित आश्रय देण्याची व त्यांचे चांगले संगोपन करण्याची गरज पंकजादीदींच्या लक्षात आली. पुढे पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल संघर्षात शहीद झालेल्या सामान्य नागरिकांच्या अनाथ मुलामुलींचाही प्रश्र्न पुढे आला.

दरम्यानच्या काळात जम्मूतील दिवाण बद्रिनाथ यांचे जम्मूतील घर राष्ट्र सेविका समितीकडे सुपूर्त करण्यात आले. या ठिकाणी अदिती प्रतिष्ठान या नावाने अनाथ मुलींसाठी वसतिगृह सुरु केले त्याची जबाबदारी पंकजादीदी पहात आहे.जम्मूत आल्यापासूनच पंकजादीदी जम्मू, दोडा, पूँछ, अखनूरच्या सीमावर्ती भागात सातत्याने प्रवास करीत आणि तिथल्या नागरिकांना धीर देण्याचे काम करीत. सीमेपलीकडून अचानक सुरू होणारा गोळीबार किंवा तोफांचा मारा तिथे नेहमीचा आहे. काही वेळा पंकजादीदींच्या समोर काही अंतरावर तोफांचे गोळे फुटले असतानाही त्या कधी घाबरल्या नाहीत किंवा त्यांनी त्यांचा प्रवास थांबवला नाही.घातपाती कारवायांमध्ये जखमींची रुग्णालयांमध्ये जाऊन विचारपूस करणे हेही त्यांचे नित्याचे काम झाले आहे. त्यामुळे पोलिस, रुग्णालये, स्थानिक नागरिक अशी माहिती पंकजादीदींना सतत देत असतात. तीन मुलींना घेऊनच अदिती वसतिगृहाचे (छात्रावास) काम सुरू झाले.अदिती वसतिगृहात जम्मूबरोबरच लेह-लडाख भागातील अनाथ मुलींनाही आश्रय दिला जातो. न्यायालयामार्फतही काही अनाथ मुली वसतिगृहात संगोपनासाठी पाठवल्या जातात. या सर्वांचा पंकजाताई अतिशय प्रेमाने सांभाळ करतात व त्यांच्यावर चांगले संस्कार करतात. वसतिगृहात राहून मोठ्या झालेल्या मुलींचे योग्य वर शोधून विवाह लावून देण्याचे कामही पंकजाताई करत आहेत.सीमावर्ती पहाडांमधील गावांमध्ये गुज्जर बक्करवाल हा शेळी-मेंढीपालन करणारा भटका समाज मोठ्या प्रमाणावर आहे. पाकिस्तानातून आलेले दहशतवादी घरातल्या धमकावून स्थानिक मुलींशी बळजबरीने लग्न करतात. त्यातून राज्याचे नागरिकत्व मिळवून लपूनछपून दहशतवादी कृत्ये करत राहतात. अशीच फसवणूक झालेल्या एका बक्करवाल मुलीचा पंकजादीदींनी काही वर्षे अतिशय जोखमीने व तिची ओळख उघड होऊ न देता सांभाळ केला. तिने दिलेल्या माहितीच्या आधाराने लष्कराने काही दहशतवाद्यांना पुढे अटक केली. या मुलीचे नंतर लग्न झाले.जम्मू परिसरातील मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवून त्यांचा दहशतवादी कृत्यांसाठी वापर करण्याचे प्रयत्नही दहशतवादी करतात. अशाच एका मुलीच्या साह्याने पंकजादीदींवर हल्ला करण्याचा व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न दीदींच्या सावधपणामुळे यशस्वी होऊ शकला नाही. दीदींना उर्दू भाषेत व हिज्बुल मुजाहिदीनचा शिक्का असलेले धमकीचे पत्रही मिळाले आहे.पण अशा धमक्यांना त्या घाबरल्या नाहीत किंवा हाती घेतलेले कामही थांबवले नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देऊ केलेले संरक्षणही पंकजादीदींनी नाकारले. हत्यारबंद पोलिस सतत माझ्याबरोबर आले, तर घाबरलेल्या मुली माझ्याकडे येतील कशा आणि मी त्यांचा सांभाळ तरी कसा करू, असा प्रश्र्न त्या विचारतात.सरकारी यंत्रणेचा वापर करून पंकजादीदींना त्रास देण्याचे प्रयत्नही झाले आहेत. वर उल्लेख केलेल्या बक्करवाल मुलीच्या संदर्भात दीदींना जम्मू-काश्मीरमधील पाच वेगवेगळ्या ठिकाणच्या न्यायालयांनी समन्स बजावले. अशा वेळी पोलिसप्रमुख व न्यायाधीशांना योग्य प्रकारे समजावून सांगण्याचे कौशल्यही त्यांना दाखवावे लागले.‘आप को डर नहीं लगता’, या प्रश्र्नावर पंकजादीदी उद्गारल्या ‘अब भी नहीं डरती. डरती तो काम क्या करती?’ भारतीय राज्यघटनेत तात्पुरते म्हणून घुसवलेले ३७० कलम आणि नागरिकांना व महिलांना दुजाभाव देणारे कलम ३५अ केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी निरस्त केले. जम्मू-काश्मीरचा प्रदेश आणि तिथले जनजीवन खऱ्या अर्थाने उर्वरित भारताशी जोडण्याच्या प्रयत्नांना आता वेग आला आहे.  मुलाखतीच्या शेवटी त्‍यांनी  तमाम भारतीयांना आवाहन केले की, वैष्णव देवीच्या दर्शनासह आमच्या सेवाकार्यात सहयोग दयावा.

मला बाया कर्वे पुरस्कार मिळाल्यामुळे माझ्या कामातील आत्मविश्वास वाढला आहे.  संस्थेने  जम्मू येथे आपले शैक्षणिक कार्य त्याच प्रमाणे काश्मिर येथे सेवाकार्य सुरु करणेबाबत आपल्या मनोगतात इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत व्यवस्थापक मंडळाचे सभासद सीमा कांबळे  यांनी केले  .निवड समितीचे सभासद संजय तांबट यांनी पंकजादीदीच्या कार्याचा मागोवा घेतला व निवड समितीचे मनोगत व्यक्त केले. निवड समितीचे सभासदांचा परिचय संस्थेचे कार्याध्यक्ष रविंद्र देव यांनी केला. पंकजादीदी यांची प्रकट मुलाखत  विद्या कुलकर्णी व संजय तांबट यांनी घेतली. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव डॉ. पी.व्ही.एस. शास्त्री यांनी केले व सुत्रसंचालन कविता भोपळे यांनी केले.