‘उद्धवजी… तुमचा नम्रपणा हीच तुमच्या पक्षातल्या बंडखोरांना चपराक आहे’

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात (Crisis on Uddhav Thackeray government) सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भावनिक आवाहन केले.

दरम्यान,  माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू? माझ्याशी थेट का बोलत नाही? सुरतला जाण्याची काय गरज? आजही समोर येऊन एकाने सांगितले तरी राजीनामा देण्यास तयार. आज मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे. पण समोर येऊन बोला.शिवसेनेचे लाकूड वापरुन घाव घालू नका. माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं…. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो… जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या भावनिक आवाहनाचं एमआयएमने (MIM) कौतुक केलं आहे, तुमचा नम्रपणा हीच तुमच्या पक्षातल्या बंडखोरांना चपराक आहे. तुमच्याबद्दल माझ्या मनात असलेला आदर वाढला, असं कौतुक एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी केलं आहे.  एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील असताना त्या जिल्ह्याच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणं हा एक वेगळ्याच चर्चेचा विषय झाला आहे.