2019 मध्ये लोकांनी बहुमताचा जनादेश भाजपा-शिवसेना महायुतीला दिला होता त्यावेळी उपग्रहाचा प्रयोग केला होता का?

राम कुलकर्णी – ठाकरे शिवसेनेचे नेते मंडळी नैराश्याच्या गर्तेत सापडल्यानंतर काय आरोप कुणावर करतील? याचा आता नेमच नाही. माजी खा.चंद्रकांत खैरेंनी दोन दिवसापुर्वी देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांच्यावर आरोप करताना उपग्रहाद्वारे एव्हीएम मशीन नियंत्रित करू शकतात असं म्हणत गरळ ओकुन टाकली. खरं तर अत्यंत बालिशपणाचा आरोप असुन उचलली जीभ टाळाला यापेक्षा दुसरं वर्णन याचं करणं शक्य नाही. त्यांनी लावलेला जावाईशोध आत्मानंदासाठी उत्साह वाढवणारा असेल पण भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचे नेते, कार्यकर्ते आपल्या कामातून सेवाभाव वृत्तीतून समर्पण आणि त्यागातून सामान्य जनतेची सेवा करतात. मग लोकांची मने जिंकतात. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी अशा प्रकारे मतदान मिळवण्याची वेळ पक्षावर कधीच येणार नाही हे खैरेंनी लक्षात घेण्याची गरज.

ठाकरे गटातील नेत्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करून घ्यायला हवं. 2019 मध्ये लोकांनी बहुमताचा जनादेश भाजपा-शिवसेना महायुतीला दिला होता.त्यावेळी उपग्रहाचा प्रयोग केला होता का? आज ज्या प्रकारच्या शंका खैरेंसारख्या अनुभवी जेष्ठ राजकारणी पुढार् यांना येवु लागल्या. त्यांनी मान थोडी मागे वळवायला हवी. धोका तर भाजपला या मंडळींनी दिला. बारामती गाठून महाविकास आघाडीची स्थापना केली. व्यक्ती स्वार्थापोटी सारं काही महाभारत घडलं आणि घडवलं. पण शिवसेनेची वाताहत झाल्यापासुन नैराश्येच्या गर्तेत सापडलेली त्यातही साठी पार झालेली नेतेमंडळी अगदी वयोमाने काय बोलतील नेमच नाही? खा.संजय राऊत रोज सुर्योदयाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या घालतात. अलीकडे पक्षात आलेल्या सुषमाताई अंधारे, पेडणेकर, अरविंद सावंत ही सारी मंडळी ज्यांना वैचारिक कुठलाही अजिंडा नाही. केवळ आरोप करणं आणि लोकांची दिशाभुल करत आवाज उठवणं यापेक्षा दुसरा विषय दिसत नाही. मागच्या चार-पाच वर्षात संजय राऊत यांच्या तोंडून केवळ राजकिय द्वेषाची भाषा विस्तवासारखी बाहेर पडते. विकासाच्या प्रश्नावर या माणसाने कधीही आवाज उठवलेला जनतेने पाहिलं नाही. सतत नकारात्मक भूमिका घेऊन राजकीय संस्कृती बिघडवण्याचे काम या मंडळींनी करून टाकले.

महाराष्ट्राच्या इतिहासात खालच्या स्तराची भाषा कधीच केली नाही. चंद्रकांत खैरेंनी तर परवा माध्यमांसमोर बोलताना केवळ प्रसिद्धी आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला आरोप हास्यास्पद म्हणावा लागेल. काय तर म्हणे उपग्रहाद्वारे व्होटिंग मशिन नियंत्रित करून भाजप विजय मिळवु शकतो?देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तो आरोप त्यांनी केला. एक गोष्ट खरी आहे अमितभाई शहा राष्ट्रहिताचे निर्णय घेण्यासाठी धाडसी नेता म्हणून त्यांची ओळख ज्यांनी 370 कलम हाटवलं. पण खैरेंना हे माहित नाही भाजपाला गल्ली ते दिल्ली यश मिळतं त्या कारणाचा शोध त्यांनी आत्मचिंतन करून घ्यायला हवा. भाजपा हा नवा पक्ष नाही. संघर्षाचा इतिहास शुन्यातुन निर्माण करताना अगदी दोन खासदारावरचा पक्ष संसदेत बहुमताकडे गेला. साठ-सत्तर वर्षे देशाच्या राजकारणात पक्षाची विचारसरणी आणि अजिंडा या चौकटीच्या बाहेर कधीच न जाता सत्ता लोभापोटी घाणेरडे राजकारण न करता सामान्य माणुस नजरेसमोर ठेवुन त्याची सेवा करणं, त्याग, समर्पण, राष्ट्रभक्ती तथा हिंदुत्वाचं रक्षण यावर आधारित पक्षाचा अजिंडा आहे. स्वातंत्र्यानंतर ज्या काँग्रेसने देशाचे नेतृत्व केलं, त्याला सामान्य जनता वैतागुन गेली होती. केवळ आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश परिवर्तनाच्या दिशेने जात असताना ज्या गोष्टी साठ वर्षात काँग्रेसवाल्याला सोडवता आल्या नाहीत, त्या अवघ्या आठ वर्षात करून दाखवल्या.

नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावुन काम करताना अमितभाई शहा यांनी देखील दाखवलेली कसब ज्यामुळे सर्वसामान्य जनता, कष्टकरी, शेतकरी, तरूण, महिला यांच्या मनामनात कमळ घर करून बसलं आहे. केवळ वर्तमान राजकिय परिस्थिती नव्हे जेवढे वर्षे काँग्रेसने देशावर राज्य केलं त्याहुन अधिक काही वर्षे आता देशाच्या राजकारणातुन भाजपा बाहेर राहु शकत नाही हा सामान्य जनतेचा विश्वास.उपग्रहाद्वारे मशिन मॅनेज करण्याचा आरोप खैरे सारख्या जेष्ठ राजकारणी नेतृत्वाला मुळात शोभत नाही. केवळ शालेय शिक्षणात बाकावर बसलेल्या मुलांनी बालवयात बोलावं तशा प्रकारे खैरे बोलुन गेले असं म्हणता येईल. त्याहुन अधिक सांगायचं झालं तर खैरेंच्या पक्षाची राजकिय अवस्था सध्या विचित्र आहे. कदाचित मानसिक नैराश्य मोठ्या प्रमाणावर आलेले असुन त्यातुनच असे आरोप केले जातात. छत्रपती संभाजीनगर केंद्र सरकारने नामकरण केल्यानंतर देखील राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्षेप घेतात. हा सवती मत्सराचा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गटाच्या लोकांनी मांडलेला दिसतो.

अवघ्या चोवीस तासानंतर राज्य सरकारने देखील संपुर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या जाहिर करण्याची अधिसुचना काढली. भाजपा केवळ बोलुन दाखवणारा पक्ष नाही तर करूनच दाखवणारा पक्ष असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दानवे ला उत्तर देताना दिली. त्यानुसार अधिसुचना देखील निघाली. ठाकरे गटाच्या नेत्यांना संजय राऊताची सवय अंगवळणी पडताना दिसते. सारी तोंडाळ नेते मंडळी अलीकडच्या काळात राऊतासारखी भाषा बोलताना दिसू लागली. राज्याची राजकिय संस्कृती मागच्या पाच वर्षात द्वेष आणि मत्सराने बिघडुन टाकण्यास सिंहाचा वाटा कोणाचा असेल? तर राऊतसारखे नेते स्पर्धेत आघाडीवर असलेले दिसतात. बाकी काही असलं तरी चंद्रकांत खैरेंनी जावाईशोध लावताना केलेला आरोप बालिश म्हणावा लागेल. रोज असं वक्तव्य जर ठाकरे गटाचे नेते करू लागले तर खर् या अर्थाने निवडणुकीत भाजपाला प्रचार करण्याची गरज भासणार नाही अशी परिस्थिती येवुन बसेल. तिकडे भास्कर जाधव हे देखील उडाणटप्पू भाषा बोलण्यात प्रसिद्ध असल्याने जनता मात्र मनोरंजनाच्या पलीकडे या मंडळींना दखल घेताना दिसत नाही. गंमत बघा कशी असते मध्यंतरी सुषमाताई अंधारे पक्षात आल्याबरोबर त्यांना उद्धव ठाकरेंनी मुख्य चेहरा बनवला पण काही कालावधी गेल्यानंतर साईड ट्रॅक केलं. नेमकं कशामुळे केलं? हे आता सामान्य जनतेत लपुन राहिलं नाही. काल परवा तर मुंबईवरून किशोरीताई पेडणेकर यांना मराठवाड्यात पाठवलं. सुषमाताई अंधारे असताना पुन्हा नविन चेहरा मराठवाड्यात पाठवणं विशेषत: अंधारेंच्या बीड जिल्ह्यात देखील माजलगावात पेडणेकर ताई येवून जाणे हे कशाचे लक्षण समजावे? याचाच अर्थ ठाकरे गटाच्या भोवती नैराश्य वातावरण पसरलेलं असुन काय करावं?काय नाही? या गर्तेत मंडळी सापडलेली दिसते.