गोवा, उत्तर प्रदेशात ‘म्याव-म्याव’चा आवाज नाही आला, नितेश राणेंनी उडवली खिल्ली

मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये जंगी प्रचारसभा घेतली होती. असं असून देखील शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्राबाहेर पक्ष विस्तार करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने शिवसेनेने गोव्यात आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उभे केले होते. शिवसेनेने काँग्रेससोबत युती करण्यासाठी बोलणे देखील केली होती.

मात्र शिवसेनेची गोवा आणि उत्तर प्रदेशातील परिस्थिती पाहता अत्यंत गचाळ कामगिरी सेनेनं केली आहे असच म्हणावं लागेल. यावरून आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. ‘गोवा, उत्तर प्रदेशात ‘म्याव-म्याव’चा आवाज नाही आला, खूप वाईट वाटतंय.’ असं म्हणत नितेश राणेंनी खिल्ली उडवली आहे.