दिशा सालियान प्रकरणावरून पेडणेकरांची तक्रार अन् रुपाली चाकणकरांचा नारायण राणेंना तगडा झटका

मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणात राज्यातील मंत्र्याचा सहभाग असल्याचा आरोप करणारे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल आला होता. मात्र, भाजपचे नेते तो खोटा ठरवू पाहत आहेत. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता. तरीही नारायण राणे तिच्यावर बलात्कार झाला असे सांगून मृत्यूनंतर एकप्रकारे तिचे चारित्र्यहनन करत आहेत, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, दिशा सालियन हिच्यावर लैंगिक अत्याचार झालेले नाहीत. तरीही भाजपच्या नेत्यांकडून वारंवार तिचे चारित्र्यहनन केले जात आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी याप्रकरणात लक्ष घालावे.

त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने किशोरी पेडणेकर यांच्या तक्रारीची दखल घेत नारायण राणे याना तगडा झटका दिला आहे. ‘मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे.मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे.’ अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.

तर, याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत. असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.