ठाण्यात शिवसेनेला खिंडार, नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली 66 नगरसेवक शिंदे गटात

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू असून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक हे द्विधा मनस्थितीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या विचारांच्या वारसदाराला साथ द्यावी की रक्ताच्या वारसदाराला मदत करावी असा यक्षप्रश्न सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपसोबत युती करून मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. बुधवारी रात्री या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

ठाण्यातील 66 नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.