दोन वर्षात महाविकास आघाडीने लोकांना घरी बसवुन लोकांकडून फक्त वसुली केली – चिले

मुंबई – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत तर विरोधीपाक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर म्हणावी तेवढी चांगली कामगिरी सरकारला करता आली नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचा दाखला देत महाविकास आघाडीतील नेते स्वतःच्या सरकारचा बचाव करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते योगेश चिले यांनी या निमित्ताने हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्ष झाली. या दोन वर्षात कोरोना काळात महाविकास आघाडीने लोकांना घरी बसवुन लोकांकडून फक्त वसुली केली. दामदुपटीने वीजबील वसुली, शाळेच्या फीची वसुली, सगळ्या करांची वसुली, कोरोनाच्या नावाखाली चौपट रकमेची टेंडर काढून वसुली… फक्त वसुली आणि वसुलीच… खर तर यांना महाविकास आघाडी बोलण्यापेक्षा महावसुली आघाडी बोलणे जास्त योग्य आहे अशी टीका चिले यांनी केली आहे.