बंगालमधील तरुणांना विचित्र व्यसन, नशेसाठी करत आहेत कंडोमचा वापर 

दुर्गापूर  – पश्चिम बंगालमधील (West Bengal) दुर्गापूर शहरात (Durgapur city) सध्या तरुणांना एक विचित्र व्यसन लागले आहे. असुरक्षित लैंगिक संबंधांपासून संरक्षण करण्यासाठी कंडोमचा (Condom) वापर केला जात असला, तरी येथील तरुण त्याचा वापर ड्रगप्रमाणे (Drugs) करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अनेक दुकानांमध्ये साठा आल्यानंतर काही तासांनी संपत आहे. ड्रग्जसाठी कंडोमचा वापर केल्याने शहरातील प्रत्येकजण हैराण झाला आहे. तरुणांमधील हे नवीन व्यसन (addiction) प्रशासनाचीही चिंता वाढवत आहे.

गेल्या काही दिवसांपासून दुर्गापूरमधील दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, बेनाचिती आणि मुचीपारा, सी झोन, ए झोन अशा विविध भागात फ्लेवर्ड कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे आश्चर्यचकित झालेल्या एका स्थानिक दुकानदाराने आपल्या जागेवरून वारंवार कंडोम खरेदी करणाऱ्या तरुणाला विचारले. तर नशेसाठी ते विकत घेतो, असे आश्चर्यकारक उत्तर त्याने दिले. दुर्गापूर येथील एका मेडिकल स्टोअरचालकाने सांगितले की, पूर्वी दररोज केवळ 3 ते 4 पॅकेट कंडोम विकले जात होते, परंतु आता पूर्ण बॉक्स विकले जात आहेत.

हे युवक नशेसाठी कंडोमचा वापर कसा करतात, याबाबत माहिती देताना दुर्गापूर येथील मंडळ हॉस्पिटलमध्ये काम करणारे धीमान मंडल म्हणाले की, कंडोममध्ये काही सुगंधी संयुगे असतात याचाच वापर ते नशा करण्यासाठी करतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने (National Library of Medicine) याबाबतचे एक संशोधन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार कंडोममध्ये एरोमॅटिक कम्पाऊंड असतात, हे कम्पाऊंड विरघळल्यानंतर त्याचे रुपांतर अल्कोहोलमध्ये होते. त्यामुळे त्याचे व्यसन लागण्याची शक्यता असते. नेमका हाच प्रकार सध्या प. बंगालात घडताना दिसतो आहे.

दुर्गापूर आरई कॉलेज मॉडेल स्कूलचे रसायनशास्त्राचे शिक्षक नूरुल हक म्हणाले की, गरम पाण्यात कंडोम जास्त वेळ भिजवून ठेवल्याने मोठे सेंद्रिय रेणू अल्कोहोल कंपाऊंडमध्ये मोडतात, ज्यामुळे नशा होते. ड्रग्ज म्हणून विचित्र गोष्टी वापरण्याची ही पहिलीच घटना नाही. 21 व्या शतकाच्या मध्यात, नायजेरियामध्ये टूथपेस्ट आणि शूच्या शाईची विक्री अचानक 6 पटीने वाढली होती.

दुकानदारांनी सांगितले की नशा करणारे तरुण या कंडोमचा उपयोग वाफ घेण्यासाठी करतात. अनेक जण इतर नशा करण्याऐवजी आता कंडोमची वाफ घेऊ लागले असल्याचीही माहिती आहे. जर कंडोमला बराच काळ पाण्यात उकळत ठेवले तर त्याच्यातील अल्कोहोल असणारे द्रव्य हे पाण्यात मिसळते. हे नशा करणारे तरुण अशाच प्रकारे कंडोम उकळून, त्याची वाफ घेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर हे कंडोम उकळलेले पाणीही काही तरुण नशा करण्यासाठी पित असल्याची माहिती आहे.