साखरसम्राटांची आता खैर नाही; आयकर विभागाने सुरु केली धडक कारवाई 

भोपाळ – करचुकवेगिरीच्या प्रकरणात आयकर विभागाच्या पथकाने भोपाळ आणि जबलपूर येथील साखर व्यावसायिकांवर छापे टाकले आहेत. यासोबतच प्राप्तिकर विभागाच्या पथकाने नरसिंगपूर येथील साखर कारखानदाराच्या घरावरही छापा टाकला आहे. त्यांच्याकडून कोट्यवधींच्या बेनामी व्यवहारांची माहिती समोर आली आहे.

आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाच्या पथकाने भोपाळमधील साखर कारखान्याचे व्यापारी नवाब रझा, जबलपूरचे व्यापारी भरत चिमनानी आणि सुरेश हातवानी यांच्या घरांवर छापे टाकले. यासोबतच नवाब रझा यांच्या नरसिंगपूर येथील महाकौशल साखर कारखान्यावरही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यावसायिकांनी गैरव्यवहार करून कोट्यवधींचा आयकर चुकवून शासनाची फसवणूक केली आहे. आयकर विभागाच्या पथकाकडे या व्यापाऱ्यांविरोधात सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यानंतर टीमने गुपचूप व्यावसायिकांची माहिती गोळा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यावसायिकांनी बोगस विक्री कंपन्या तयार करून करोडोंचा कर चुकवला आहे.

जबलपूर येथील भरत चिमनानी यांच्या घरावर छापामार कारवाईदरम्यान, आयकर विभागाचे पथक वजनाचे यंत्र घेऊन आत पोहोचले. छापामार कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या आयकर विभागाची कारवाई सातत्याने सुरू आहे. बोगस सेल कंपन्यांकडून करचुकवेगिरीचे प्रकरण संपूर्ण महाकौशलमध्ये समोर आले आहे.

बडे व्यावसायिक बोगस शेल कंपन्या तयार करून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करतात आणि हवालाद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले जातात. त्यामुळे व्यावसायिकांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये बोगस सेल कंपन्या बनवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. सध्या छापेमारी सुरू असून, विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.