शिवसेनेत इनकमिंग सुरूच; माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी घेऊन शिवसेना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी पुन्हा सक्रिय होण्याची डॉ. सावंत यांनी यांची इच्छा

मुंबई :- राज्याचे माजी आरोग्यमंत्री तसेच माजी आमदार डॉ. दीपक सावंत यांनी काल  नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी घेऊन शिवसेना तळागाळात पोहचवण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय होण्याची इच्छा डॉ. सावंत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.(Incoming continues in Shiv Sena; Former Health Minister Dr. Deepak Sawant joins Shiv Sena).

डॉ. दीपक सावंत त्याच्याशिवाय शिवसेनेला सहकार्य करणारे ऍड. हर्षल चोरडिया आणि ऍड गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणी मधील सर्व सदस्यांनी देखील शिवसेना प्रणित प्रवक्ते किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राष्ट्रीय कर्मचारी संघटनेत प्रवेश केला. या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना डॉ. दीपक सावंत यांनी आपण शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना पक्षात सक्रियरित्या काम करायला सुरुवात केली. शिवसेनेच्या माध्यमातून पालघर येथील कुपोषणग्रस्त मुलांसाठी तसेच मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी काम केले. स्वर्गीय आनंद दिघे यांच्यासोबत देखील काम करण्याची संधी त्यावेळी मला मिळाली. त्यांच्यासोबत काम करतानाच एकनाथ शिंदे यांच्या कामाचा मला अंदाज आला आणि कोरोना काळात त्यांनी ज्या पद्धतीने ठाणे शहरात आरोग्य सेवा बळकट केली तसेच कमी वेळात रुग्णालये उभी केली ते पाहून प्रभावित झालो असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. मला पक्षात सक्रिय काम करण्याची इच्छा होती मात्र मला पक्षप्रमुखांनी सक्तीची व्हीआरएस दिल्याने मला थांबावे लागले. त्यानंतर मी पुन्हा पक्षाकडे काम देण्याची विनंती केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी ऑनलाइन बोलताना त्यांना तशी विनंती देखील केली होती, तसेच माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना तसे पत्र देखील लिहिले होते. मात्र तरिही पक्षाने काम करण्याची संधी दिली नाही त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सक्रीय होऊन शिवसेना तळागाळात पोहचवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, तसेच यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची एक संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केली असून ती राबवून राज्यातील सर्वसामान्य माणसाला पक्षाशी जोडण्याचा आपला मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रदीर्घ काळ काम केले होते. शिवसेना भाजप युती सरकारमध्ये ते आणि मी मंत्रिमंडळात एकत्र काम केले होते. त्यांनी पालघर मध्ये कुपोषणग्रस्त मुलांसाठी केलेले काम किंवा आरोग्य मंत्री असताना टेलिमेडिसीन या संकल्पनेचा दुर्गम भागात केलेला वापर याचा मी स्वतः साक्षीदार होतो. त्यांना पक्षासाठी अधिक भरीव काम करण्याची इच्छा होती मात्र त्यापूर्वीच त्यांना सक्तीची व्हीआरएस घ्यायला लावून घरी बसवण्यात आले. डॉ. सावंत यांनी आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा अनुभव पाहता सरकारला त्याचा नक्की फायदा होईल असे सांगत आता पुन्हा एकदा ते नव्या जोमाने पक्षात सक्रिय होतील असे सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार रवींद्र फाटक,शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना महिला संघटीका सौ. कला शिंदे, अंधेरी विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.