Babanrao Lonikar : लोणीकरांच्या अडचणीत वाढ, शिवीगाळ प्रकरणात ऊर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेश

जालना : वीज कापल्याने भाजपच्या आमदाराने वीज वितरणच्या इंजिनिअरला शिवीगाळ करत धमकावल्याचा (BJP MLA threaten to Mahavitaran engineer) प्रकार समोर आला. या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल (BJP MLA audio clip viral) होत आहे. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) हे महावितरणच्या इंजिनिअरला शिवीगाळ आणि धमकी देत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणं आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे. डॉ.राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत, असे ही डॉ. राऊत म्हणाले.

दरम्यान, वीज वितरण कंपनीचे आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात असून मी कुठल्याही प्रकारचा फोन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लावलेला नसून आणि माझे कुठलेही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेले नाही. त्यामुळे मी फोन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

काही षडयंत्र रचणाऱ्या लोकांनी माझी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप (viral audio clip) समाज माध्यमांमध्ये व्हायरल केली असून व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप माझी नसून ते माझ्याविरुद्ध रचलेले कुभांड असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे. माझा संभाजीनगर येथे बंगला आहे परंतु त्या बंगल्यावरील मिटर काढून नेले नाही त्यामुळे मी वीज वितरण कंपनीचे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्या मुळे मी फोन करण्याचा प्रश्नच नाही असे लोणीकर यांनी म्हटले आहे.