भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिंकली मने, ऑसी कर्णधार स्मिथही झाला खूश

अहमदाबाद- भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान स्टेडियमवर पोहोचले आहेत. येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या देशांच्या कर्णधाराचा सामन्यापूर्वी विशेष कॅप देऊन सन्मान केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्वांची मने जिंकली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) विशेष कॅप देऊन गौरव केला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्टीव्ह स्मिथला या खास कसोटी सामन्याची कॅप दिली. मग पुढे पंतप्रधान मोदींनी स्टीव्ह स्मिथला बोलावून हात जोडून स्वागत केले, तेव्हा स्मिथ (Steve Smith) आणि अल्बानीज (PM Anthony Albanese) एकमेकांमध्ये व्यस्त होते. यानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनीही रोहित शर्माशी हस्तांदोलन केले आणि चौघांनीही हात वर करून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा आदर्श ठेवला. अशा प्रकारे पंतप्रधान मोदींनी सर्वांची मने जिंकली.

या सामन्यात खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी खास वाहनातून स्टेडियमची फेरीही घेतली. यावेळी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते आणि प्रेक्षकांनी दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. या सामन्यातील नाणेफेकीसाठी एक खास नाणे बनवण्यात आले होते, ज्यामध्ये दोन्ही देशांच्या 75 वर्षांच्या क्रिकेट स्मृतींचे चित्रण करण्यात आले होते.