IND vs NZ: दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा विजय, न्युझीलंडने हार्दिक ब्रिगेडला झुंजवले 

IND vs NZ 2nd T20I: भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. लखनौमध्ये खेळवण्यात आलेला हा सामना खूपच रोमांचक होता. 100 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही भारतीय संघाने 19.5 षटके लागली .
याआधी रांची टी-20 मध्ये भारताला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना एक मालिका निर्णायक असेल जिथे हार्दिक पांड्याचा युवा भारतीय संघ दुसरी मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

या मॅचबद्दल बोलायचं झालं तर खूप लो स्कोअरिंग मॅच पाहायला मिळाली. यावरून अंदाज लावा की T20 इंटरनॅशनलमध्ये पहिल्यांदाच भारताने डावात एकही षटकार मारला नाही. प्रथम खेळताना न्यूझीलंड संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 99 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघालाही सामना सहजासहजी जिंकता आला नाही.

भारतीय टॉप ऑर्डरने पुन्हा एकदा निराशा केली. शुभमन गिल 11, इशान किशन 19 आणि राहुल त्रिपाठी 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर गेल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा वॉशिंग्टन सुंदर येथे दुर्दैवाने धावबाद झाला.

यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांनी हळूहळू डाव पुढे नेत खेळ शेवटच्या टप्प्यापर्यंत नेला. यानंतर टीम इंडियाने शेवटच्या षटकात हा सामना आपल्या नावावर केला. हार्दिक पंड्या 15 आणि सूर्यकुमार यादवने 26 धावा करून नाबाद माघारी परतला. पण न्यूझीलंड संघाने ज्या प्रकारे हे छोटे लक्ष्य राखण्याचा प्रयत्न केला त्याचे कौतुक करावे लागेल. यापूर्वी रांचीमध्येही भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या फिरकीपटूंसमोर झुंजताना दिसले होते.