अनुसूचित जाती आश्रमशाळेचे आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण; वेतनश्रेणीच्या मंजुरीसाठी शिक्षकांचा लढा सुरूच

मुंबई/ ज्ञानेश्वर राजुरे – आझाद मैदान येथे 165 अनुसूचित जातीच्या आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 23 जानेवारी 2023 वार सोमवार पासून शाहू, फुले, आंबेडकर निवासी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज 18 वा दिवस असून सदरील उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र पद्धतीने करण्याच्या इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

राज्यातील 165 अनुसूचित जातीच्या आश्रम शाळेतील शिक्षकांचा प्रश्न गेल्या 18 ते 20 वर्षापासून प्रलंबित आहे. शाहू, फुले, आंबेडकर निवासी शाळा योजनेतून 8 मार्च 2019 रोजी 20 टक्के अनुदान घोषित करण्यात आलेले आहे. या शाळेत राज्यभरातील अनुसूचित जातीचे मुले व मुली शिक्षण घेत असतात. 165 अनुसूचित जातीच्या आश्रम शाळेचा वेतनश्रेणीचा प्रस्ताव मागील सहा महिन्यांपूर्वी शासनाकडे सादर केलेला आहे. अद्यापही त्या प्रस्तावावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. सदरील वेतनश्रेणीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण पुकारले आहेत.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन श्रेणी तसेच वैयक्तिक मान्यता व संच मान्यता सेवा सातत्य तात्काळ देण्यात यावे, विद्यार्थी परिपोषण 100% प्रमाणे देण्यात यावे, वि. जे. एन. टी. च्या आश्रम शाळेच्या धर्तीवर शाळा संहिता लागू करण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण चालूच राहील असा निर्धार सर्व उपोषणकर्त्यां कर्मचाऱ्यानी केलेला आहे. तरी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी विनंती सदरील उपोषणकर्त्या शिक्षकांकडून करण्यात आलेली आहे. शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती नवबौद्ध 165 निवासी अनुदानित आश्रम शाळेची कृती समिती आपल्या मागण्यावर ठाम असून मागण्या मान्य न झाल्या या आंदोलनास तीव्र स्वरूप प्राप्त होऊ शकते.