बांगलादेशला पराभूत करत भारत सेमीफायनलमध्ये, २०२० चा ‘तो’ बदलाही घेतला

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीच्या 19 वर्षांखालील मुलांच्या विश्व करंडक स्पर्धेत काल रात्री अँटिग्वा येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतानं बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव करून उपांत्य फेरी गाठली. विशेष म्हणजे भारताने या विजयासह बांगलादेशसोबतचा बदलाही पूर्ण केला. याच बांगलादेशने २०२० मध्ये भारताला अंतिम फेरीत नमवून जेतेपदावर नाव कोरलं होतं.

उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी 37 षटकं आणि 1 चेंडू खेळून अवघ्या 111 धावापर्यंत मजल मारली. भारताचा वेगवान गोलंदाज रवी कुमार यानं तीन तर फिरकी गोलंदाज विकी ओस्तवालनं दोन बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल भारतानं अंगक्रिश रघुवंशीच्या 44 आणि शेख रशीदच्या 26 धावांच्या जोरावर विजयाचं लक्ष्य अवघ्या 30 षटकं आणि 5 चेंडूत 5 गडी गमावून पार केलं. बांगलादेशकडून रिपन मंडोलनं चार बळी घेतले. त्यापूर्वी भारतीय कर्णधार यश धुलनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या विजयासह, भारत आता बुधवारी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी लढणार आहे.